पनवेल दि.१०: पनवेल महापालिका हद्दीत पहिला करोना रुग्ण बरोबर 1 वर्षापूर्वी म्हणजेच दि.10 मार्च 2020 रोजी सापडला होता. आज वर्षपूर्तीनंतर करोना आपल्या शहरातून कायमस्वरूपी जाईल, अशी आशा निर्माण झाली होती. तथापि तसे न होता आज पुन्हा एकदा करोना रुग्णाची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. आज 100 पेक्षा जास्त करोना रुग्ण महापालिकेच्या हद्दीमध्ये आढळलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा गेल्या वर्षीप्रमाणेच करोना संसर्ग रोखण्यासाठी आपणा सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहेत.
गेल्या वर्षभरामध्ये आपण सर्वच पनवेलकर त्यामध्ये सर्व अधिकारी कर्मचारी, पोलिस अधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार, एनजीओ, डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय, सफाई कामगार इत्यादींनी आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून पनवेल मधील करोना रुग्णांना वाचविण्यासाठी जिवापाड प्रयत्न केले, त्यामुळेच आपल्या शहरात इतर शहरांच्या मानाने करोनाची लागण कमी झाली होती. तरीसुद्धा गेल्या वर्षभरामध्ये दुदैवाने 648 लोकांना करोनामुळे आपला जीव गमवावा लागला तर 30 हजार नागरिकांना करोनाची लागण झाली.
मात्र सद्य:स्थितीमध्ये करोनाची भीती गेल्यासारखे लोक वागत असून कुठल्याही प्रकारचे कोविड-19 चे प्रोटोकॉल, शासकीय सूचना न पाळता, नियम न पाळता रस्त्यावर, बाजारामध्ये फिरत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा करोनाने आपले डोके वर काढले असून संसर्ग वाढत आहे. ही बाब निश्चितच चिंताजनक आहे. त्यामुळे करोनावर मात करायची असेल तर मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे, वारंवार हात स्वच्छ धुणे अतिशय गरजेचे आहे, तसेच अतिशय गरज असेल तरच घराबाहेर पडणे, या गोष्टी पाळणे, ही काळाची गरज बनली आहे. नाहीतर काळच आपल्याला आपल्या लोकांपासून हिरावून नेईल. म्हणून पश्चाताप करीत न बसता पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की, आपण करोनाचे नियम पाळा आणि करोनावर मात करा. शासनाच्या “माझे कुटूंब-माझी जबाबदारी” तसेच “मी जबाबदार” मोहिमेमध्ये जबाबदारीने सहभागी होवून शासन व जिल्हा प्रशासन करीत असलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा.
पुनरावृत्ती नको..काळजी घ्या….!
लेखन:-
संजय गोविंद शिंदे
उपायुक्त,पनवेल महानगरपालिका