पनवेल दि.१०: पनवेल शहरी भागातील वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्यांचे भूमिगत वाहिन्यांमध्ये रूपांतर करण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला होता. व त्या संदर्भात मागणी व पाठपुरावा करून शासनाचे या प्रश्नावर लक्ष केंद्रित केले. त्या अनुषंगाने महावितरणकडून १५१.५३ कोटी रक्कमेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनविण्यात आला, असून सदर डीपीआर १.३ टक्के डीडीएफ योजनेंतर्गत समाविष्ट करून पनवेल महानगरपालिकडे कार्यकारी अभियंता, महावितरण पनवेल शहर यांनी दिनांक २३ फेब्रुवारी २०२१ रोजी सादर केला आहे, अशी माहिती लेखी उत्तराद्वारे राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी दाखल केलेल्या तारांकित प्रश्नात, पनवेल शहरी भागातील वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्या भूमिगत करण्याची मागणी ऊर्जा मंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली असल्याचे नमूद करून शहरातील उच्च व लघुदाब वीज वाहिन्या जवळपास २० ते २५ वर्षे इतक्या जुन्या असल्याने जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे पावसाळयात ठिकठिकाणी होणारे शॉर्ट सर्किट तसेच पक्षी बसून वीज वाहिन्या बंद पडून वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी शासनाने चौकशी करून पनवेल शहरातील वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात आहे, अशीही विचारणा या प्रश्नाच्या माध्यमातून शासनाला केली. तसेच या संदर्भात त्यांनी मागणी करून सातत्याने पाठपुरावा केला आहे.
या प्रश्नावर ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले कि, पनवेल शहरास वीज पुरवठा करणाऱ्या काही उच्चदाब व लघुदाब वाहिन्या उपरीतार पद्धतीच्या असून त्या साधारणतः ३० वर्षांपेक्षा जास्त जुन्या झाल्या कारणाने वादळवाऱ्यात झाडाच्या फांद्या पडून वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना पावसाळ्यात घडून येतात. अखंडीत वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने उपरीतार लघुदाब व उच्चदाब वाहिन्यांचे भूमिगत वाहिन्यांमध्ये रूपांतर करण्याकरिता महावितरणकडून १५१. ५३ कोटी रक्कमेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनविण्यात आला असून सदर डीपीआर १.३ टक्के डीडीएफ योजनेंतर्गत समाविष्ट करून पनवेल महानगरपालिकडे कार्यकारी अभियंता, महावितरण पनवेल शहर यांनी दिनांक २३ फेब्रुवारी २०२१ रोजी सादर केला आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!