सोहळ्यानिमित्त सर्व जिल्ह्यांमध्ये वर्षभर विविध उपक्रम
मुंबई, दि. २९: राज्य शासनामार्फत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला दि. १ व २ जून २०२३ रोजी रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा प्रेरणा देणारा हा दिवस असून त्यानिमित्त राज्यात वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी स्पर्धा, महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांवर शिववंदना, जाणता राजा महानाट्याचे राज्यभर प्रयोग आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.
रायगडावर होणाऱ्या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये सर्वांनी उत्साहाने सहभागी होऊन इतिहासाचे साक्षीदार होण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले. सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी भोजन, पाणी, मंडप, आरोग्य सुविधा यांची चोख व्यवस्था प्रशासनाने करावी. गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश रायगड जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिले.
यावेळी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार भरत गोगावले, महेंद्र थोरवे, प्रशांत ठाकूर, महेंद्र दळवी, प्रकाश सुर्वे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज, रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे, काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष श्री.महेंद्रघरत यांच्यासह शिवराज्याभिषेक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.