आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला चहाव्यवसायिक रविंद्र मगर यांचा सत्कार
पनवेल दि.३०: येथील चहावाले रविंद्र मगर यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच सन्मान करण्यात आला होता. पनवेलचा चहावाला दिल्लीच्या गौरवास पात्र झाल्याबद्दल भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविंद्र मगर यांचा आज येथे सत्कार केला.
पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाजवळील पदपथावरील चहाविक्रेते रवींद्र काशिनाथ मगर यांनी प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत कर्ज घेऊन त्याची परतफेड व्यवस्थितरित्या केली. गेली ३५ वर्षे चहा विक्रीचा व्यवसाय करणार्या पनवेलच्या रवींद्र मगर यांचा नुकताच केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयातर्फे दिल्लीत विज्ञान भवन येथे सत्कार करण्यात आला होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्ष भेट देत आणि चर्चा करून रविंद्र मगर यांचा सन्मान केला. त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज मगर यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या. या सर्व बाबतीत आलेला अनुभव कथन करताना मगर यांनी माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना असल्याचे नमूद करून गेल्या ५० वर्षात केंद्रातून असा सामान्य माणसाचा सन्मान कुणीच केला नसल्याचे अधोरेखित केले. आणि आपण खूप भारावून गेलो होतो, असेही त्यांनी सांगितले.
देशाचे लोकप्रिय कार्यतत्पर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यासोबत पनवेलच्या चहावाल्याची भेट हि पनवेलकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे. यापुढेही अशीच प्रगती करत रहा आणि कधीही काहीही गरज लागल्यास आवर्जून हाक द्या, अशा शब्दात आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविंद्र मगर यांचा ‘मोदी @२०’ हे मराठी अनुवादीत पुस्तक देऊन सत्कार करताना म्हंटले. यावेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा संघटन सरचिटणीस दीपक बेहेरे, अविनाश कोळी, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, माजी नगरसेवक विकास घरत तसेच वृषभ मगर उपस्थित होते.