पनवेल दि.१९: राज्यामध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातीतोंडी आलेला घास हिरावला गेला आहे. ११५ लाख हेक्टर शेतीचे सर्वेक्षण करायला सहा महिने लागतील त्याऐवजी राज्य सरकारने पंचनामे न करता आणि केंद्राकडे बोट न दाखवता शेतकऱ्यांना ताबडतोब सरसकट आर्थिक मदत करावी, अशी आग्रही मागणी राज्याचे माजी कृषीमंत्री व किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.अनिल बोंडे यांनी आज येथे केली.
पनवेल तालुक्यातील गिरवले येथे किसान संवाद सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार प्रशांत ठाकूर यांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली.
यावेळी संवाद सभेत बोलताना डॉ. अनिल बोंडे पुढे म्हणाले कि, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी जागरूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱयांच्या विकासासाठी तीन विधेयके पारित करून शेतकऱयांना मोठा दिलासा दिला आहे. मात्र विरोधक त्याचा अपप्रचार करत शेतकऱ्यांनी आणि जनतेची दिशाभूल करीत असल्याचा टोलाही त्यांनी राज्य सरकारला लगावला. कोकणात झालेल्या वादळाची आठवण करून देत राज्य सरकारने तुटपूंजी मदत देऊन वादळग्रस्त शेतकरी आणि जनतेच्या तोंडाला पाने पुसली असल्याचे त्यांनी नमूद करतानाच आत्ताच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असताना राज्य सरकार मात्र निद्रास्त झाले. शेतकऱ्यांकडून जागे होण्याची मागणी झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज लाजेस्तव घराबाहेर पडले. मात्र त्यांनी मदतीची कोणतीच घोषणा केली नाही. त्यामुळे या सरकारला शेतकऱ्यांची काळजी नसल्याचे स्पष्ट होत आहे. आम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण आणि त्यांच्याप्रती आदर आहे, त्यामुळे जोपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही तो पर्यत आम्ही या सरकारच्या पाठीमागे लागून शेतकऱ्यांना मदत देण्यास भाग पाडू, असेही त्यांनी यावेळी आश्वासित केले. मागील वर्षी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसताना शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी करत होते मग मुख्यमंत्री झाल्यावर मागचे विसरले काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आपल्या देशातील शेतकऱ्यांनी देशाला आत्मनिर्भर केले आहे, त्यामुळे शेतकऱ्याला आत्मनिर्भर करण्यासाठी व शेतकऱ्याचे उत्त्पन्न दुप्पट व्हावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करीत आहेत. शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून तीन कृषी विधेयके पारित करून शेतकऱ्यांच्या उन्नतीत भर टाकली आहे, असे यावेळी अधोरेखित करून पंतप्रधान किसान सन्मान योजना, पंतप्रधान सिंचन योजना, सूक्ष्म योजना, बागायती, जैविक शेती, अशा विविध यॊजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंमलात आणून शेतकऱ्याला मोठा आधार दिला असल्याचे डॉ. बोंडे यावेळी आवर्जून नमूद केले.
यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हंटले कि, अन्नदात्याचा देशभरात सन्मान करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. देशातील शेतकरी दलालांच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी त्यांना शेतीमालाची विक्री कुठेही आणि योग्य भावात विकण्याचे स्वातंत्र्य मिळण्यासाठी केंद्र शासनाने कृषी विधेयक मंजूर केले. या विधेयकाला विरोधासाठी विरोध करत अपप्रचार विरोधी करत आहे. मात्र मोदी सरकारने शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास हा ध्येय्य ठेवला आहे, त्यामुळे अनेक योजना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आखल्या असल्याचे त्यांनी नमूद केले. भाजपनेते बांधावर जाऊन शेतकऱ्याला दिलासा देत आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांचा विचार करत आहे मात्र तिघाडीचे राज्य सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा घणाघाती हल्ला त्यांनी केला. लॉकडाऊन काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ लाख कोटी रुपयांचे पॅकेज सर्वसामान्य माणसासाठी दिले पण राज्य सरकार आपल्या जबाबदारीतून पळ काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केला.
या संवाद सभेस आमदार महेश बालदी, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, किसानमोर्चाचे संपर्क प्रमुख सुनिल गोगटे, प्रदेश सचिव अशोक गायकर, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, किसन मोर्चाचे जिल्हाध्यक्ष परशुराम म्हसे, तालुकाध्यक्ष आत्माराम हातमोडे, बुद्धीजीवी सेलच्या जयश्री चित्रे, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, यांच्यासह विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व शेतकरी उपस्थित होते.