नवी मुंबई दि.५: नेरूळ येथील एसआयईएस कॉलेजच्या वाङ्‌मय मंडळातर्फे शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी “श्रावणसरी – महिना सणांचा वर्षाव कवितांचा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी काव्य स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम असे स्वरूप असलेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार, कवी संदीप बोडके हे उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्यांसह प्राचार्या डॉ. कोयल रॉयचौधरी, संयोजिका मीनल सरोदे, सहसंयोजिका रूपाली झेले, लता लोखंडे, सचिव दिपेश पालव, सहसचिव तन्वी कोळी आदी उपस्थित होते.
सुरुवातीला मंडळाच्या सदस्यांनी गणपती गीत सादर केले. यानंतर विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या. यामध्ये आई, बाबा, प्रेम, श्रावण अशा विविध विषयांवरील कविता होत्या. स्पर्धेच्या मध्ये कोळी नृत्य व दहीहंडी नृत्य सादर करण्यात आले. या नवीन प्रयोगाला उपस्थित दर्शक विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला. यावेळी शिक्षिका लता लोखंडे, स्वाती विटकर यांनीही कविता सादर केल्या. त्यानंतर प्रमुख पाहुणे संदीप बोडके यांनी आपले मनोगत व्यक्त करतना विद्यार्थ्यांना कवितेविषयी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचा उत्साह आणि सहभागी कवींच्या सुंदर रचना पाहून, आता मराठी भाषेच्या भविष्याची चिंता वाटत नसल्याचे मनोगतात सांगितले. त्याचबरोबर त्यांनी स्पर्धेत सहभागींचे कौतुकही केले व निवडक कविताही सादर केल्या. यानंतर काव्य स्पर्धेतील पाच विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली. त्यामध्ये महेश तिडके प्रथम, सायली पवार द्वितीय, अनुजा लवाटे तृतीय, सोनल तांडेल, कृष्णा पाटील उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. सर्व सहभागींना संदीप बोडके यांनी प्रत्येकी एक पुस्तक भेट दिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजश्री शिंदे, अभिषेक दांडेकर, कार्तिकी मोरे, अर्चना पिंगळे, चैतन्या डुंबरे, स्वरा बांदिवडेकर, भैरवी पाटील, अनघा गाडे, पर्व थेरे, शिवानी खलाटे, रिया प्रभू यांनी परिश्रम घेतले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!