पनवेल दि.५: श्रावण महिना म्हणजे सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. यातीलच एक महत्त्वाचा सण म्हणजे गोकुळाष्टमी. पारंपरिक पेहराव व वाद्यांच्या चालीवर सर्वचजण श्रीकृष्ण जन्माचा उत्सव आनंदात साजरा करतात. यानंतर दुसर्या दिवशी दहीहंडी फोडण्याचा थरारदेखील अविस्मरणीय असतो. दरवर्षी रायगडात ठिकठिकाणी लाखो रुपयांची बक्षिसे असलेल्या दहीहंडी स्पर्धा ठेवण्यात येतात. त्यामुळे जिल्ह्यात दहीहंडी सणासाठी सर्वत्र उत्साह संचारला आहे.
लाखोंची बक्षिसे असल्याने तरुणांसह महिलांमध्ये उत्साह आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी खास महिलांसाठी दहीहंडी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सुधागड, महाड, रोहा, पनवेल, पनवेल आदी तालुक्यात लाख रुपयांचे पारितोषिक असलेल्या दहीहंडी आहेत. नोकरी, व्यवसाय व शिक्षण या निमित्त मुंबई, पुणे ठाणे व इतर जिल्ह्यात असलेले तरुण आवर्जून दहीहंडी उत्सवासाठी आपल्या गावी येतात. शिवाय लाखोंचे पारितोषिक आपल्याच पथकाला मिळावे यासाठी गोविंदा महिनाभर आधीपासूनच थर रचण्याचा सराव करीत आहेत.
श्रीवर्धनमध्ये विशेष परंपरा
श्रीवर्धन तालुक्यात अनेक नवस गोकुळाष्टमीच्या दिवशी पूर्ण केले जातात. प्रत्येक पाखाडीतून स्वतंत्र दावण निघते. दावण म्हणजे पाखाडीतील तरुण लहान मुले मानवी साखळी निर्माण करतात. एकमेकांच्या हातांची गुंफण करत श्रीकृष्णाचा जयघोष करीत प्रत्येक पाखाडीतील लोक संपूर्ण गावभर भ्रमंती करतात. दावण हा मैत्री, एकोपा, प्रेम, आपुलकी, स्नेह याचे प्रतीक मानले जाते. हा उत्सव निरंतर दोन दिवस चालतो. श्रीकृष्ण जन्म रात्री झाल्यानंतर दुसरा पूर्ण दिवस तरुणाईने नृत्य करते. शहराच्या विविध भागात विविध मंडळांकडून लावण्यात आलेल्या दहीहंडीला फोडण्याचे काम गोविंदा पथके करतात.
दहीहंडीनिमित्त जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त तैनात
दहीहंडीनिमित्त जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये. यासाठी अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एसआरपीएफ एक प्लाटून, आर.सी.पी प्लाटून दोन,स्ट्रायकिंग फोर्स पाच, 1 अ.पो. अधीक्षक, 8 उप विभा.पो. अधिकारी, 123 पो. अधिकारी, 1300 पो.अंमलदार, होमगार्ड 350 आदीचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.