ठाणे दि.22: ज्येष्ठ पत्रकार सोपान बोंगाणे यांचं आज दुपारी निधन झालं. बोंगाणे यांची दोन्ही मुलं ही पुण्यात असल्यामुळं ते गेले काही दिवस पुण्यातच राहत होते. गेल्यावर्षी त्यांना निमोनिया झाला होता. आताही त्यांना काही दिवसापूर्वीच दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर कोविडचे उपचार सुरू होते. अगदी काही दिवसापूर्वीच त्यांनी रूग्णालयातील वातावरण आणि कोरोनावरून सुरू असलेल्या भयानक परिस्थितीचं वर्णन केलं होतं आणि रूग्णालयात रूग्णालयीन कर्मचारी कसे रूग्णांसाठी जीवाची बाजी लावत आहेत याचं वर्णनही त्यांनी केलं होतं. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडं असा परिवार आहे. बोंगाणे यांनी एकीकडे बँक आॅफ इंडियामध्ये नोकरी करतानाच दुसरीकडे स्थानिक पातळीवर पत्रकारिता सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक वर्ष लोकसत्ताचे ठाणे प्रतिनिधी म्हणून काम केलं. गेले काही वर्ष ते पुण्यनगरीचे ब्युरो चीफ म्हणूनही काम पाहत होते. आपल्या तब्येतीची विशेष काळजी घेणारे बोंगाणे असे अचानक जातील असं कधी वाटलंच नव्हतं. बोंगाणे यांचं जाणं म्हणजे पत्रकारितेला मोठा धक्का आहे.