कळंबोली दि.१६: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड आणि पोलीस मुख्यालय नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई विभाग कुस्ती स्पर्धेचे दि.९ ते ११ऑक्टोबर रोजी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सु.ए.सो. इंग्रजी माध्यमाची इयत्ता ७ वी ची कु. संस्कृती अशोक खरे हीने ५० किलो वजनी गटात सुवर्णपदक प्राप्त करून परभणी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. कुस्ती स्पर्धेत नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थिनीचे शाळेच्या वतीने कौतुक करण्यात आले अन् पुढील स्पर्धेसाठी शाळेचे वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. सुधागड विद्या संकुलाचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांनी सुवर्ण भरारी घेणाऱ्या विद्यार्थिनीचे शाबासकीची थाप देऊन गोड कौतुक केले. शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना किशोर कुलकर्णी यांनी संस्कृती खरे हिस पुष्पगुच्छ देऊन विद्यालयाच्या वतीने सत्कार केला. यावेळी वर्गशिक्षिका प्रीती मिश्रा, शाळेचे क्रीडा शिक्षक मराठे, रईस पिंजारी, शरद पाटील आणि गोरखनाथ कार्ले उपस्थित होते. सदर स्पर्धेसाठी शाळेचे क्रीडा शिक्षक आणि पोलीस मुख्यालय चे प्रशिक्षक संपत्ती सर, मयुर जाधव आणि समाधान सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.