बौद्धिकदृष्ट्या विकलांग मुलामुलींमधील कार्यकुशलतेवर लक्ष केंद्रित करण्याची गरज
मुंबईतील अनाम प्रेम परिवारातर्फे आयोजित राष्ट्रीय परिसंवादात तज्ज्ञांच्या निष्कर्षाची नोंद

लोणावळा: दि.०१ (अमिन खान) बौद्धिकदृष्ट्या विकलांग समजल्या जाणा-या मुलामुलींमध्ये अनेकबाबतीत सामान्यांच्या तुलनेत सरस कौशल्यगुण आहेत. त्यांच्यातील कुशलतेला वाव मिळवून दिल्यास व्यावहारिक जगात त्यांचे जगणे सुकर होईल, असे मत लोणावळा येथे झालेल्या तीन दिवसीय दहाव्या राष्ट्रीय बौध्दिक विकलांग परिसंवादात तज्ज्ञांनी व्यक्त केले. एकाग्रता, उत्सुकता आणि निरागसता ही अशा मुलामुलींमध्ये सामान्यांपेक्षा जास्त असल्याने त्यांच्यातील कार्यकुशलतेवर शासन, प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थानी एकत्रितपणे लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याच्या निष्कर्षाची नोंद यावेळी करण्यात आली.
अनाम प्रेम परिवार आणि सुमती ग्राम ह्यूमन राईटस् प्रोटेक्शन फोरमतर्फे 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान लोणावळा येथे आयोजित ‘साद-प्रतिसाद’ 2023 बालशिबिरात महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, कर्नाटक, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश या सहा राज्यातील बौद्धिकदृष्ट्या विकलांगांच्या विशेष शाळांमधील दीडशेहून अधिक मुलामुलींनी सहभाग घेतला.
दरम्यान, लोणावळ्याजवळील टाटा पॉवर बॉटनिकल गार्डनला या मुलांनी भेट दिली. तेथील निसर्गाचा आनंद घेताना जैवविविधतेबाबत त्यांनी कमालीची उत्सुकता दाखविली. दुस-या दिवशी स्मरणशक्ती स्पर्धा, दुकानदार व्यवहार स्पर्धा, निरीक्षण-अनुभव कथन स्पर्धा घेण्यात आल्या. ऐत्यावेळी विषय देवून त्यांच्यातील कलागुणांची केलेली पारख समाधानकारक असल्याचे मुख्य संयोजक तन्वी ठाकूर यांनी सांगितले. ‘कलाविष्कार’ कार्यक्रमात बालकलाकारांनी नृत्य, संगीत, नाटिकांच्या केलेल्या सादरीकरणाने प्रेक्षकांना अचंबित केले. विजेत्यांना अनाम प्रेम परिवाराचे सदस्य अंजली ठाकूर व सतीश नगरे, हेलन केलर संस्थेचे सीईओ योगेश देसाई व शिक्षण संचालक अनुराधा बागची, उपप्राचार्य प्रिया गोन्सालवीस, अनाम प्रेम परिवाराचे सदस्य तथा चित्रपट निर्माता व दिग्दर्शक नितिन पानसे आणि लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

गीतसंगीतातून मतिमंदत्वावरील उपचार आशादायक
समारोप समारंभात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक पंडित डॉ. केशव गिंडे आणि सतारवादक विदुषी जयाताई जोग यांनी सादर केलेल्या 90 मिनिटांच्या सांगितीक मैफलीत विकलांग मुलेमुली मंत्रमुग्ध झाली. दरम्यान, सौरभ नगरे यांनी रूद्रवीणा वादन केले. अनाम प्रेम परिवारातर्फे अशा मुलामुलींवर गीतसंगीतातून मतिमंदत्वावर उपचार करण्याचे प्रयोग आशादायक ठरत असल्याचे आषुतोष ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष धीरूभाई कल्याणजी, समाजसेवक तथा उद्योजक नंदकुमार वाळंज, उद्योजक नितीन वाडेकर, वरसोलीचे सरपंच संजय खांडेभरड आदि मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी, लोणावळा पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल विकारी, अॅड. संजय पाटील, संतोष पाळेकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे, तबला वादक मनोज कदम आदिंचा सत्कार अंजली ठाकूर, हीमा नगरे आदि सदस्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास अनाम प्रेम परिवाराचे संतोष पाळेकर, सारिका पाळेकर, अरूण माळी, शीतल सावंत, नूतन देशपांडे, अनुप सामंत, मातीकाम कौशल्य विकासचे प्रमुख किरण त्रिलोकी आदिंचे सहकार्य लाभल्याचे पानसे यांनी सांगितले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!