2 ऑगस्ट ते 05 ऑगस्ट पर्यंत मनाई आदेश लागू
अलिबाग दि.02 : मौजे आदरवाडी व डोंगरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र.753 एफ वरील रस्त्याला एका बाजूस अतिवृष्टीमुळे तडा गेला असून रस्ता खचलेला असल्याने त्या ठिकाणी दुर्घटना टाळण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 एफ हा रस्ता दि 02 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12.00 पासून ते दि 05 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 08.00 वाजेपर्यंत आपत्ती व्यवस्थापन कायदा अधिसूचनेनुसार बंद करण्याचा मनाई आदेश जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पुणे डॉ.सुहास दिवसे यांनी जारी केला आहे.
पुणे ते माले गाव ते पुणे रायगड जिल्हा हद्द ते माणगाव राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 एफ चे रुंदीकरणाचे कामकाज चालू असून पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 एफ वरील ताम्हिणी घाट क्षेत्रात अतिमुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मौजे आदरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 एफ वर साखळी क्र. 63/000 येथे दरड कोसल्यामुळे महामार्ग पूर्णतः बंद केला होता. या दुर्घटनेमुळे महामार्गाच्या कडेला महामार्गाच्या हद्दीत पिकनिक फॅमिली हॉटेलमधील एक व्यक्ती मयत व एक व्यक्ती जखमी झाला होता.
दि.01 ऑगस्ट 2024 रोजी मौजे आदरवाडी व डोंगरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 एफ वरील साखळी क्र.61/650 ते 61/680 मध्ये रस्त्याला एका बाजूने अतिवृष्टीमुळे तडा गेला असून रस्ता खचलेला आहे. सदरचे ठिकाण हे ताम्हिणी घाट वन परिसर क्षेत्रात असून अतिमुसळधार पावसामुळे रस्ता एका बाजूने खचलेला आहे. रस्ता खचलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम चालू आहे व वाहतूक सुरक्षितेच्या दृष्टीने उपाययोजना करणे सुरु असून आता महामार्गावरील वाहतूक सदर ठिकाणी एका बाजूनेच चालू ठेवलेली आहे. तसेच पुढील काही दिवसात अतिवृष्टी झाल्यास सदर रस्ता अजून खचून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर महामार्गावरुन नियमित वाहतूक ठेवणे धोकादायक आहे. तरी शनिवार व रविवार या दिवशी ताम्हिणी घाट परिसर क्षेत्रात पर्यटनासाठी अनेक लोकांची गर्दी होत असून राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 एफ हा बंद करणे आवश्यक आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!