‘भव्य रोजगार मेळावा’ मध्ये १८२८ उमेदवारांनी घेतला सहभाग
पनवेल दि.३ : आयुष्य घडविण्यासाठी संकल्प महत्वपूर्ण असते. त्यामुळे स्वतः ची ओळख, आवडते क्षेत्र आणि उत्तम व प्रतिभावंत होणे ही त्रिसूत्र अंगिकारा, अशी मार्गदर्शक सूचना माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी आज खांदा कॉलनी येथे झालेल्या कार्यक्रमात विदयार्थ्यांना केली.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त चांगू काना ठाकूर उच्च महाविद्यालय (स्वायत्त) आणि सी. डी. देशमुख स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना “१० वी, १२ वी नंतरच्या करिअरच्या संधी आणि व्यक्तिमत्व विकास” या विषयावर ‘मार्गदर्शन सत्र व विद्यार्थी संवाद’ कार्यक्रम’ त्याचबरोबरीने पाचवी ते पदवीधर असलेल्या उमेदवारांना रोजगाराच्या दृष्टिकोनातून ‘भव्य रोजगार मेळावा’ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली खांदा कॉलनी मधील चांगू काना ठाकूर उच्च महाविद्यालयात पार पडला. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या कार्यक्रमांना प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, कार्यकारिणी सदस्य अनिल भगत, संजय भगत, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, प्राचार्य एस. के. पाटील, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, मनोहर म्हात्रे, विकास घरत, प्रवीण पाटील,विजय चिपळेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा राजेश्री वावेकर, कामगारनेते जितेंद्र घरत, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, ऍड. चेतन जाधव, प्रदीप भगत, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
अविनाश धर्माधिकारी यांनी पुढे बोलताना सांगितले कि, नमस्कार आणि सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा हि जीवनातील दोन मंत्र आहेत. समोरच्या व्यक्तीला नमस्कार केल्याने आपल्यात आणि त्या व्यक्तीमध्ये ईश्वरी चैतन्य निर्माण होते तर दुसऱ्या मंत्रामुळे सर्व विश्वाचे कल्याण करण्याची शक्ती मिळते. सर्व विश्वाचे कल्याण करणारी आपली भारतीय संस्कृती आहे आणि जगाला कल्याणाची शिकवण आपल्या देशाने दिली आहे. संकल्प आपल्या आयुष्याला आकार देण्याचे काम करते आपण जसे व्यक्तिमत्व घडवू तसा जीवनाला आकार येते. माणूस म्हणून आपल्याला सन्मानाने जगता आले पाहिजे आणि त्यासाठीही संकल्प महत्वाचा असतो. सर्व करिअर चांगले आणि समान असतात, फक्त त्याची निवड आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार करणेही तेवढेच गरजेचे असते. आणि हे करताना बदलता काळही लक्षात घेतला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. शिक्षणातून करिअर करताना भारतमातेची सेवा झाली पाहिजे हेही आपल्या मनात रुजले पाहिजे आणि त्या अनुषंगाने केलेली वाटचाल मार्गदर्शक ठरणार आहे. जगात दिवसेंदिवस बदल घडत आहे आणि पुढील सहा वर्षात एआय विज्ञान क्षेत्रामुळे प्रचंड बदल होणार आहे. आणि तसा त्याचा परिणाम होणार आहे. एआय मुळे रोजगार कमी होणार असले तरी त्या क्षेत्रातील रोजगारांची निर्मितीही मोठ्या प्रमाणात होणार आहे, त्यामुळे त्याचाही वेध घेत त्यामध्येही करिअरची संधी असल्याचे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञान बदलेल संधी बदलतील मात्र स्पर्धा परीक्षा कायम राहतील त्यामुळे विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात करिअर करावे, असे आवाहनही त्यांनी करत सीकेटी महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राला आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी म्हंटले कि, आपला देश विविध संस्कृतीने भरला आहे आणि या देशाचा सुजाण नागरिक होणे हि सर्वांची जबाबदारी आहे. आजचा विद्यार्थी उद्याचा बलाढ्य भारत आहे, त्यामुळे प्रत्येक तरुणाने त्याची जाणीव ठेवून मार्गक्रमण केले पाहिजे. विज्ञान पुढे जात आहे आणि त्यानुसार काळ बदलत आहे. त्यामुळे आपण निवडलेले क्षेत्र हे जीवनाला दिशा देणारे असले पाहिजे. त्यासाठी मेहनत घ्या आणि कुटुंबासोबत देशही महत्वाचा आहे त्या अनुषंगाने अविनाश धर्मधिकारी यांनी आपल्या अमूल्य मार्गदर्शनातून दिलेल्या सूचना आत्मसात करा, असे आवाहनही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी बोलताना, अटल सेतू, आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीएमुळे आगामी पाच वर्षाच्या काळात या परिसरात जगातील विविध प्रकल्प येणार आहेत. तसेच या ठिकाणी असलेल्या अनेक विद्यापीठातून विविध शैक्षणिक कोर्सेस उपलब्ध आहेत. आणि त्या अनुषंगाने आजच्या विद्यार्थ्यांना संधीचे द्वार उपलब्ध होणार आहे. त्यानुसार परिसरात येणाऱ्या संधीचे सोने करण्यासाठी विद्यार्थांनी आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढवावी, असे आवाहन केले. यावेळी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी तर आभार प्रदर्शन स्पर्धा परीक्षा केंद्राचे प्रमुख जे. एम. पावरा यांनी केले.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!