पनवेल दि.१६: बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगड यांच्या वतीने व रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आयोजित करण्यात आलेली योनिक्स सनराईज द्वितीय महाराष्ट्र सीनियर स्टेट सिलेक्शन रामशेठ ठाकूर ट्रॉफी बॅडमिंटन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेत स्पर्धकांनी चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात झाला.
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सेक्रेटरी सिद्धार्थ पाटील, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे जनरल सेक्रेटरी वाय. टी. देशमुख, स्पर्धेचे संयोजक व बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगडचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, स्टार युनियन लाईफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक अभय तिवारी, ताराचंद इन्फ्रा लॉजिस्टिकचे व्यवस्थापकीय संचालक विनय अगरवाल, माजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू लिरॉय डी’सा , जीएमबीए चे अध्यक्ष प्रदीप अयंगार, बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगड उपाध्यक्ष रविंद्र भगत, शिवकुमार करयिल, सेक्रेटरी डेव्हिड अल्वारिस, खजिनदार नरेंद्र जोशी, रेफरी विनय जोशी, मयुरेश पाटील यांच्यासह खेळाडू व बॅडमिंटन रसिक उपस्थित होते.
क्रीडा संस्कृती अधिक बळकट करण्यासाठी अत्याधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य सुरू आहे. बॅडमिंटनसारख्या खेळात स्थानिक खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर झेपावत आहेत. अशा स्पर्धांमुळे नवोदित खेळाडूंना आवश्यक व्यासपीठ मिळते. पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या खेळाडूंमध्ये अत्यंत चुरशीची सामने पाहायला मिळाले. पुरुष आणि महिला दोन्ही गटांमध्ये काही सामने निर्णायक टप्प्यापर्यंत रंगले, प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत प्रतिसाद दिला. उदयोन्मुख खेळाडूंनी अनुभवी खेळाडूंना दिलेली कडवी टक्कर विशेष उल्लेखनीय ठरली. कोर्टवरील जलद हालचाल, तांत्रिक कौशल्य आणि अचूक स्मॅशेसमुळे अनेक सामने प्रेक्षकांसाठी रोमांचक ठरले. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी उपस्थित राहून विजेत्यांचे जोरदार स्वागत केले. उत्तम व्यवस्थापनामुळे सर्व सामने नियोजित वेळेत आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धेचे संयोजक व बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगडचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर आणि सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा मुख्य गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांमधील सुमारे ३०० सर्वोत्तम खेळाडूंचा सहभाग होता. या स्पर्धेतील विजेते, उपविजेते आणि उपांत्य फेरीतील खेळाडूंना एकूण ४ लाख रुपयांची रोख पारितोषिके, चषक आणि प्रमाणपत्र देऊन तसेच रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे संस्थापक लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वतीने अंतिम फेरीतील खेळाडूंसाठी अतिरिक्त दीड लाख रुपयांचे विशेष रोख पारितोषिक देऊन सन्मानित केले.
यावेळी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सेक्रेटरी म्हणून २४ वर्षे जबाबदारी सांभाळणारे सुंदर शेट्टी यांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लाईफ टाइम अचिव्हमेंट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरुष एकेरी गटात अथर्व जोशी यांनी विजेतेपद तर ओम गवंडी उपविजेता, महिला एकेरी गटात श्रुती मुंदडा विजेतेपद तर उपविजेता आर्या कोरेगावकर, पुरुष दुहेरी गटात प्रथम क्रमांक विप्लव कुवळे व विराज कुवळे तर द्वितीय क्रमांक अर्जुन बिराजदार व आर्यन बिराजदार, महिला दुहेरी गटात प्रथम क्रमांक नेहाल गोसावी व विधी चाफेकर, द्वितीय क्रमांक अनन्या गाडगीळ व सानिया पाटणकर तसेच मिश्र दुहेरी गटात विजेतेपद दीप रामभिया व सोनाली मिरखेलकर तर उपविजेता सोहम पाठक व इशिता कोरेगावकर यांनी पटकाविले.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!