पनवेल,दि.२६: मा मुख्यमंत्री महोदयांच्या १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत इ गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर झाला. यामध्ये पनवेल महानगरपालिकेचे बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला आहे. राज्यातल्या एकूण २९ महानगरपालिकांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला होता. नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई अश्या मोठ्या व अनुभवी महानगरपालिका स्पर्धेत असताना पनवेल महानगरपालिकेने २६ जानेवारी रोजी आपला झेंडा फडकवला असून याबाबत पनवेलचे विशेष कौतुक होत आहे. आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या नेतृत्वात परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे व संगणक विभागाचे उपायुक्त स्वरूप खारगे यांच्या टीमने अथक मेहनत करीत हा बहुमान पटकावला. पनवेल महानगरपालिकेने यापूर्वीही १०० दिवसांचा प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमामध्ये उत्तम कामगिरी बजावत तिसरा क्रमांक पटकावला होता.
इ गव्हर्नन्स सुधारणा
१५० दिवसांच्या इ गव्हर्नन्स सुधारणामध्ये महानगरपालिकेचे संकेतस्थळ वापरण्यास सुलभ, सुरक्षित, अद्ययावत असणे, महानगरपालिकेचे डॅशबोर्ड विकसित करणे, आपले सरकार अंतर्गत नागरिकांना विहित वेळेत सुलभतेने सेवा पुरवणे, कार्यालयात ई ऑफिसचा प्रभावी वापर करणे, व्हाॅटस अप चॅटबोटचा वापर करणे, एआयचा वापर करणे, जीआरएसचा वापर करणे अशा घटकांचा समावेश होता.
या सर्व घटकांचे सादरीकरण दिनांक १० जानेवारी रोजी महानगरपालिकेने सादर केले होते. या स्पर्धेचे मूल्यांकन क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडिया (Quality Council Of India) (QCI) या राष्ट्रीय संस्थेने पारदर्शकपणे केले होते.

![]()
