अलिबाग,दि.2 : आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, महसूल व वनविभाग, महाराष्ट्र राज्य यांनी पत्रात नमूद केलेली वस्तू:स्थिती विचारात घेता संभाव्य चक्रीवादळामुळे होणारे नुकसान व जीवित हानी टाळण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील सागर,खाडी तटीय तालुक्यातील (अलिबाग, पेण, मुरुड, तळा, म्हसळा, श्रीवर्धन व रोहा) या खाडी/समुद्र किनाऱ्यालगतच्या गावांमधील नागरिकांना दि.02 जून 2020 रोजीचे रात्रीचे 12.00 वाजल्यापासून ते दि.03 जून 2020 रोजीच्या रात्री 12.00 वाजेपर्यंत घराबाहेर पडण्यास तसेच त्यांच्या पाळीव पशु व प्राणी यांना मोकळया जागेत सोडण्यास, फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मनाई आदेश जारी केला आहे.
सदरचा आदेश शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस, आरोग्य सेवा व अत्यावश्यक सेवा व वस्तू यांची वाहतूक, करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी कार्यरत संबंधित आपत्ती निवारण व्यवस्थापनातील अधिकारी, कर्मचारी तसेच माझ्यावतीने परवानगी दिलेल्या व्यक्तींना लागू नसतील.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता कलम 188 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 सह अन्य कायद्यातील तरतूदीनुसार फौजदारी शिक्षेस पात्र राहील, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.