पनवेल दि.९: रायगड जिल्ह्यातील प्रथम महिला वैमानिक होण्याचा मान पनवेल तालुक्यातील प्राप्ती ठाकूर हिला मिळाला आहे. प्राप्तीच्या रूपाने पनवेलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
बारामतीच्या कार्व्हर एव्हिएशन मधून निवड झालेली प्राप्ती हि जिल्ह्यातील एकमेव महिला वैमानिक आहे. प्राप्तीचे प्राथमिक शिक्षण पनवेल मधील सेंट जोसेफ हायस्कूल मध्ये झाले तर उच्च शिक्षण महात्मा एज्युकेशन सोसायटी मध्ये झाले नंतर तिने बारामतीच्या कार्व्हर एव्हिएशन मध्ये कमर्शियल पायलट ट्रेनिंग साठी प्रवेश घेतला.
प्राप्ती भरत ठाकूर हिचा जागतिक महिला दिनानिमित्त कुंडेवहाळ ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या समारंभात गौरव करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्या व महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, कुंडेवहाळ ग्रामपंचायतीचे सरपंच सदाशिव वासकर तसेच पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.