पनवेल दि.१३: श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ११ व्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत मुंबईच्या एकदम कडक नाट्य संस्थेच्या ‘पाटी’ एकांकिकाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत अटल करंडकवर आपले नाव कोरले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष, महापालिकेचे माजी सभागृह नेते व अटल करंडक स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर, सिने व नाट्यनिर्मात्या कल्पना कोठारी, सुप्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या मोने, सुप्रसिद्ध दिग्दर्शक देवेंद्र पेम, विराजस कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, ‘ब्रँड अॅम्बेसिडर अभिनेत्री रुचिरा जाधव, प्राथमिक फेरीचे परीक्षक आशीर्वाद मराठे, मानसी मराठे यांच्या उपस्थितीत एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक प्रदान करून त्यांना गौरविण्यात आले.तसेच या स्पर्धेच्या अनुषंगाने महत्वपूर्ण अशा यंदाच्या गौरव रंगभूमीचा पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी सतीश पुळेकर यांचा गौरव करण्यात आला. पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे पारितोषिक वितरण झाले.
या राज्यस्तरीय स्पर्धेत एकाहून एक सरस अशा एकांकिका सादर झाल्याने बहुमानाचा अटल करंडक यंदा कोण पटकावणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली होती. अखेर या स्पर्धेत सर्वोत्तम ठरलेल्या ‘पाटी’ एकांकिकाचे नाव जाहीर होऊन त्यांना अटल करंडक विजेता बहुमान मिळाला. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक क्राउड नाट्य संस्थेच्या ‘चिनाब से रावी तक’ (७५ हजार रुपये,प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह); तृतीय क्रमांक कलांश थियर्ट्स च्या ‘क्रॅक इन द मिरर’ (५० हजार रुपये,प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह), चतुर्थ क्रमांक एम. डी. कॉलेजच्या ‘ब्रम्हपुरा’ (२५ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह)तर उत्तेजनार्थ सतीश प्रधान ज्ञानसाधना ठाणे (१० हजार रुपये,प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह) यांच्या ‘कुक्कुर’ आणि कलादर्शन पुणे यांच्या ‘बॉईल्ड शुद्ध शाकाहारी’ (१० हजार रुपये,प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह) या एकांकिकांनी पटकाविले. सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिका गुरुनानक खालसा कॉलेजची जुगाड लक्ष्मी एकांकिका ठरली. राज्यातून १०८ एकांकिकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. अंतिम फेरीसाठी राज्यातून निवड झालेल्या २५ एकांकिकांचे सादरीकरण झाले.
उत्कृष्ट आयोजन व नियोजन, भरघोस रक्कमेचे पारितोषिके, ज्येष्ठ कलाकारांचे मार्गदर्शन आणि संधी यांचे मिलाप असलेल्या या स्पर्धेतून आजवर अनेक कलाकार घडले आहेत. नाटय चळवळ वॄद्धींगत व्हावी व नाटय रसिकांना आपले नाटयाविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वॄद्धींगत व्हावा, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृहनेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी ‘अटल करंडक एकांकीका’ या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व निटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परिक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाट्य रसिकांच्या गळयातील ताईत बनली. दरवर्षी या स्पर्धेला राज्यातील कलाकार आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत असतो. त्यामुळे हि स्पर्धा राज्यात नावाजली असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना यंदाही भरघोस रक्कमेची पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे प्रायोजक ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लिमिटेड तर सहप्रायोजक नील ग्रुप आणि स्थळ प्रायोजक पनवेल महानगरपालिका हे होते. हि स्पर्धा यशस्वी होण्यासाठी स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर, नाट्य परिषद पनवेल शाखा प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, कोषाध्यक्ष अमोल खेर, भाजप सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, समन्वयक गणेश जगताप, चिन्मय समेळ, वैभव बुवा, कोमल पाटील, दिव्या शेट्ये आणि टीम अटल करंडक, सीकेटी कॉलेज आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे स्वयंसेवक यांनी विशेष मेहनत घेतली. या स्पर्धेला नाट्य संस्था, कलाकार आणि रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रदिसाद लाभला.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!