एमएमआरडीए भागातील डिजीटल क्लासरूम करणारी एकमेव महानगरपालिका
पनवेल,दि.6: छडी लागे छम छम विद्या येई घम घम हा वाक्यप्रचार पूर्वी खुप प्रसिध्द होता, विद्यार्थ्यांकडून घोटवून घोटवून घेऊन त्याला परिक्षेत लिहायला लावण्याच्या संकल्पनेतून आपण बाहेर पडले आहोत. आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी त्याला दृकश्राव्य माध्यमाचा लाभ घेता आला पाहिजे. या माध्यमातून कितीही जटिल संकल्पना सोप्या पध्दतीने शिकविली जाते. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होतो. महापालिकेच्या शाळा डिजीटल झाल्याने येणाऱ्या काळात महापालिकेचे विद्यार्थीही विविध स्पर्धांमध्ये बक्षीसे घेतील खासगी शाळांनाही त्यांची दखल घ्यावी लागेल. येणाऱ्या काळात पनवेल महापालिका शिक्षणाच्या बाबतीत अव्वल ठरेल अशी अपेक्षा आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केली.
पनवेल महानगरपालिकेच्यावतीने सर्व शाळा डिजीटल करण्यात आल्या आहेत. आज लोकनेते दि.बा पाटील शाळेमध्ये डिजीटल क्लासरूमचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
यावेळी आयुक्त गणेश देशमुख, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, उत्तर रायगड भाजपचे जिल्हाअध्यक्ष अविनाश कोळी, अतिरीक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, नगरसेवक नितीन पाटील, शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी किर्ती महाजन, सन सिस्टम कंपनीचे लक्ष्मण वायकर सर्व शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एमएमआरडीए भागातील पनवेल महानगरपालिका डिजीटल क्लासरूम करणारी एकमेव महानगरपालिका
पनवेल महानगरपालिकेच्या 11 शाळांमध्ये एकुण 57 डिजीटल बोर्ड बसविण्यात आले आहे. एमएमआरडीए भागातील सर्व शाळां डिजीटल करणारी पनवेल महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे.
या डिजीटल बोर्डमध्ये अंतर्गतच कॅम्प्युटर जोडलेला आहे. या डिजीटल बोर्डमध्ये मराठी, उर्दू, गूजराती अशा तीन माध्यमातील पहिली ते सातवीच्या वर्गांचा सर्व विषयांचा अभ्यासक्रम आहे. तसेच यूट्यबचा पर्यायही यावरती आहे. कॉम्प्यूटरप्रमाणे यामधील हव्या असणाऱ्या वर्गाच्या, हव्या त्या विषयातील धड्यावरती जाऊन सिलेक्ट केले असता ,ॲनिमेटेड स्परूपात तसेच शिक्षक शिकवतात त्याप्रमाणे सर्व अभ्यासक्रम स्क्रीनवरती दिसणार आहे. तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगही करता येणार आहे. डिजीटल बोर्ड शेअर करून एकाचवेळी शिक्षिकांना अनेक वर्गाना शिकविता येणार आहे.
यावेळी पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवरती पोदी शाळा क्रमांक 8 येथील मुख्याध्यापिका अश्विनी भोईर यांना आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. तसेच येथून पुढे दरवर्षी महापालिकेच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी घोषीत केले. त्यासाठी कमिटी गठित करण्यात येणार असून ही कमिटी आपला अहवाल सादर करणार आहे. त्या अहवालाप्रमाणे सुचविण्यात आलेल्या शिक्षकाला आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहे.