पनवेल,दि.13 : केंद्र शासनाच्या अत्यंत महत्वकांक्षी ‘आयुष्यमान भव’ मोहिमेचे उद्घाटन आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरती करण्यात आले. राज्यस्तरावरती सह्याद्री अतिथिगृह येथे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत ,यांच्या उपस्थित या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. पनवेल महानगरपालिकेच्या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ऑनलाईन पध्दतीने या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच महापालिकास्तरावरती खारघर येथील आपला दवाखाना येथे आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, माजी नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
केंद्र शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी ‘आयुष्यमान भव’ मोहिम 13 सप्टेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत राबविण्याच्या मार्गदर्शक सुचना शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत. या क्रार्यक्रमांतर्गत आयुष्यमान आपल्या दारी3.0, स्वच्छता अभियान, आयुष्मान मेळावा, रक्तदान मोहिम, अवयवदान जनजागृती मोहिम,वय वर्षे 18वर्षावरील सर्व पुरूषांची आरोग्य तपासणी मोहिम, आयुष्मान सभा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
यावेळी राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत महापालिकेस उल्लेखनीय मदत केलेल्या दिपक फर्टीलायझरच्या अधिकाऱ्यांचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच महापालिकेच्या सहकार्याने टिबी मुक्त झालेल्या रूग्णांचा सत्कार करण्यात आला. तसेच अवयव दान प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी महापालिकेचे सर्व वैद्यकिय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.