पनवेल दि.६: नव्या मुंबईवर आपला सांस्कृतिक ठसा उमटविणार्‍या, पनवेलचा सांस्कृतिक मानदंड मानल्या जाणार्‍या व पनवेलकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पनवेल कल्चरल सेंटर या संस्थेने 35 वर्षांची वाटचाल यशस्वीपणे पूर्ण केली असून 35 वा वर्धापन दिन नुकताच उत्साहात साजरा केला. सकाळच्या सत्रात भाग्येश मराठे यांनी प्रथम राग ‘मियाकी तोडी’मध्ये दोन बंदिशी तयारीने सादर केल्या. त्यानंतर देसकार रागात मध्यलयीत एक बंदिश व त्यालाच जोडून मंदारमाला नाटकातील ‘जयोस्तुते उषादेवते..’ हे नाट्यपद व ‘हरी मेरो जीवनप्राण आधार…’ हे भजन सादर करुन श्रोत्यांची वाहवा मिळविली. मध्यंतरानंतर गोव्यातील प्रख्यात गायिका विदुषी प्रचला आमोणकर यांनी आपल्या गायनाची सुरुवात शुद्ध सारंग रागाने केली. यात त्यांनी ‘नैया मोरी पार व ‘अब मोरी बात.. या दोन बंदिशी सादर केल्या. त्यानंतर गौड सारंग रागात दोन बंदीशी गाऊन ‘सोहं हर डमरू बाजे हे नाट्यपद सादर करून मैफलीचा समारोप केला. या दोन्ही कलाकारांना हार्मोनियमवर सिद्धेश बिचोलकर तर तबल्यावर किशोर पांडे यांनी समर्थपणे साथसंगत केली.
सायंकालीन सत्राची सुरुवात संस्थेने आयोजिलेल्या कथक नृत्य स्पर्धेतील दोन्ही गटातील प्रथम क्रमांक विजेत्या मिहिका भिडे व सुहानी भट या दोघींच्या कथक नृत्याविष्काराने झाली. त्यानंतर श्रीकला जोशी व वृषाली पाटकर आणि त्यांच्या विद्यार्थिनी यांनी कथक व भरतनाट्यम या दोन नृत्यप्रकारांच्या शैली आणि पैलूमधील फरक विशद करत भरतनाट्यम शैलीतून अप्रतिम असे विष्णूचे दशावतार सादर केले तर कथक नृत्यप्रकारातून ततकार पदन्यास भावमुद्रा उत्तम सादर करीत दोन्ही नृत्यप्रकारांचा छान समन्वय साधला. त्यानंतर ‘नामवैभव प्रतिष्ठान’चे मनोहर कडू व त्यांचे सुपुत्र वैभव कडू या पितापुत्रांचा त्यांच्या सांस्कृतिक-सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल संस्थेतर्फे शाल-श्रीफल, स्मृतिचिन्ह व तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. तसेच मुकुंद मराठे व किशोर पांडे यांना संस्थेचे सन्माननीय आजीव सदस्यत्व बहाल करण्यात आले. त्यानंतर प्रमुख अतिथी दिनकर गांगल यांनी ‘सांस्कृतिक संस्थांचे भवितव्य’ या विषयावरील आपल्या भाषणात ‘काळाची पावले ओळखून अधिक लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने तरुणांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधणे व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व कार्यक्रम-उपक्रम लाईव्ह दाखवले तर ते अधिक लोकांपर्यंत पोहोचतील असे मत व्यक्त केले. संस्थेच्या ‘संवाद’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन यावेळी दिनकर गांगल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुहास हळदीपूरकर, सरचिटणीस जयंत टिळक, संस्थेचे अध्यक्ष मिलिंद गोखले, उपाध्यक्ष नंदकुमार कर्वे व्यासपीठावर हजर होते. महेश गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.

🔸पनवेलमध्ये शुक्रवारी साकारणार चित्रपट संगीताचे सुवर्णयुग; ‘नौशाद ते बप्पी लाहिरी – एक सफर’

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!