अलिबाग, दि.25 : महाड शहरातील काजळपुरा भागातील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत दि. 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कोसळून दुर्घटना घडली.
स्थानिक चौकशीनुसार इमारतीमध्ये एकूण 41 सदनिका, 1 कार्यालय, 1 जिम, 1 मोकळा हॉल होता.
A विंग मध्ये एकूण 21 सदनिका हाेत्या. यामध्ये रहिवास करीत असलेल्या व्यक्तींची संख्या 54 हाेती. सुखरूप बाहेर पडलेल्या व्यक्तींची संख्या 41 असून अद्यापही इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींची संख्या 13 आहे. B विंग मध्ये 20 सदनिका हाेत्या. यामध्ये रहिवास करीत असलेल्या व्यक्तींची संख्या 43 हाेती. या दुर्घटनेवेळी सुखरूप बाहेर पडलेल्या व्यक्तींची संख्या 37 आहे. अद्यापही इमारतीमध्ये अडकलेल्या व्यक्तींची संख्या 6 अाहे.
अशा प्रकारे तारिक गार्डन या दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील एकूण 41 सदनिकांमध्ये राहत असलेल्या 97 व्यक्तींपैकी 78 व्यक्ती सुखरूप बाहेर पडू शकल्या. अद्यापही इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 19 व्यक्ती अडकलेल्या आहेत.
दूर्घटनास्थळी बचावकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकांकडून युद्धपातळीवर शोधकार्य सुरू आहे. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून 8 व्यक्तींना बाहेर काढण्यात यश आले असून त्यापैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर सात व्यक्तींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, महाड येथे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 5 व्यक्तींना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
जखमी व्यक्तींचा तपशील पुढीलप्रमाणे:- नमिरा शौकत मसुरकर, वय 19 वर्षे, संतोष सहानी, वय 24 वर्ष, फरीदा रियाज पोरे, जयप्रकाश कुमार, वय 24 वर्ष, दिपक कुमार, वय 21 वर्षे, स्वप्निल प्रमोद शिर्के, वय 23 वर्ष, नवीद हमीद दुष्टे, वय 32 वर्षे.
मृत व्यक्ती- सय्यद अमित समीर,वय 45 वर्ष.
अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतर 19 व्यक्तींचा कसून शोध सुरू असल्याचे उपविभागीय अधिकारी, महाड यांनी जिल्हा नियंत्रण कक्षास कळविले आहे.