पनवेल दि.२३: देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात शहिद भगत सिंग,शहिद राजगुरु व शहिद सुखदेव यांनी आपली आहुती देऊन ९० वर्षांपूर्वी देशाच्या इतिहासात आपले नाव अजरामर केले. ब्रिटिश राजवटीच्या गुलामगिरीचा अंत करण्यासाठी आपले बलिदान देणाऱ्या या महान हुतात्म्यांच्या स्मरणार्थ देश व विदेशात रक्तदान व प्लाझ्मादान शिबीर आयोजित करण्यात आले. त्या अनुषंगाने आज पनवेलमधील सीकेटी महाविद्यालयात रक्तदान व प्लाझ्मादान शिबीर पार पडले.
या शिबिराचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत ब-हाटे, निफाचे महाराष्ट्र प्रोजेक्ट डायरेक्टर अमेय पाटील, संवेदना महाराष्ट्राचे आयोजक स्वप्निल जगदाळे, उपप्राचार्य एस. के. पाटील, महाराष्ट्र शिबीर आयोजक चैतन् जोशी, प्रवक्ते प्रणव गोवेकर, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, चिन्मय समेळ, आदी उपस्थित होते.
नॅशनल इंटिग्रेटेड फोरम ऑफ आर्टिस्ट अँड अँक्टिव्हिस्ट्स व महाराष्ट्र आंट्रपूनर चेंबर ह्यांच्या संयुक्त विद्यमाने संवेदना मोहिमे अंतर्गत देशभरात १५०० हून अधिक रक्तदान व प्लाझ्मा दान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्या अनुषंगाने सुमारे दीड लाख रक्त युनिट दान भारत देशाला करुन शहिदांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील मुख्य शिबीर मुख्य आयोजकांसोबतीने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था, धन्वंतरी आरोग्यदूत सेवा संस्था, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या सहकार्याने खांदा कॉलनी येथील सी.के.टी महाविद्यालयात संपन्न झाले.
या मोहिमेस महाराष्ट्र शासन व राज्यातील एस बी टी आय,टाटा कॅन्सर रिसर्च,इंडियन फार्मासिट्युकल असोसिएशन, धन्वंतरी आरोग्य सेवा संस्था, बी.बी परफॉरमिंग आर्ट्स, सप्तरंग, जोंधळे सेवाभावी संस्था, नाना पालकर स्मृती समिती अश्या अनेक संस्थांनी पाठिंबा दर्शविला आहे.रक्तदान करा, व्यसन नको. तरुणांना हा निरोप देऊन, देशाला स्वेच्छा रक्तदान क्षेत्रात स्वावलंबी करण्याच्या प्रयत्नात महाराष्ट्र राज्यातील तरुणही मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. रक्तदानाच्या या मोहिमे मध्ये फक्त भारत देशच नव्हे तर परदेशात वास्तव्य करणारे अनिवासी भारतीयही सामील झाले आहेत आणि सर्वांच्या सक्रिय सहभागाने ही मोहीम अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे. संपूर्ण देशाला या विषयावर जागरूक करण्यासाठी देशभरातील १००० हून अधिक संस्था संवेदना अभियाना अंतर्गत जनजागृती मोहीम राबिवित आहेत. या मोहिमेनंतर राष्ट्रीय स्तरावर एक सॉफ्टवेअर आणि मोबाइल अॅप देखील सुरू करण्यात येणार आहे, ज्यात देशभरातील रक्तदात्यांची माहिती असेल. देशाच्या कोणत्याही भागात जेव्हा रक्त आवश्यक असेल तेव्हा त्याची गरज त्या रक्तगटाच्या रक्तदात्यांमार्फत पूर्ण जाणार असून या शिबिरात संकलित झालेल्या रक्ताची नोंद घेऊन गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये सादर केली जाणार आहे, त्यामुळे हि अत्यंत महत्वाची मोहीम ठरणार आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!