जागरूक पालक, सदृढ बालक अभियानास उद्यापासून सुरूवात
पनवेल,दि.8: प्रत्येक विद्यार्थी सुदृढ, निरोगी राहावा, यासाठी महानगरपालिका क्षेत्रात’जागरूक पालक, सदृढ बालक’ अभियान उद्या ९ फेब्रुवारीपासून महानगरपालिका कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे. तसेच नागरीकांचे आरोग्य निरोगी रहावे यासाठी महानगरपालिका व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांच्या संयुक्त विद्यमानातून महाआरोग्य शिबीराचे आयोजन उद्या दिनांक 9 फेब्रुवारीस सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांवरती होणार आहे. याचबरोबर ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या विषयास अनुसरून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन उद्या 9 फेब्रुवारीस विविध ठिकाणी करण्यात आले आहे.या सर्व कार्यक्रमाचे उद्घाटन गावदेवी मंदिराजवळील महानगरपालिकेच्या लोकनेते दि.बा पाटील विद्यालयामध्ये मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे दूरदृष्य् प्रणालीच्या माध्यमातून 10.00 वाजता करणार आहेत.
आठ आठवडे सुरू असणाऱ्या ‘जागरूक पालक, सदृढ बालक’ या अभियानांतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील बालके, मुलामुलांच्या आरोग्य तपासणी होणार आहे. यामध्ये शासकीय व निमशासकीय शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, खाजगी शाळा, अंधशाळा, अंगणवाड्या, वस्तीगृहे , शाळाबाह्य मुले-मुली अशा सर्वांची तपासणी यामध्ये होणार आहे.आयुक्त श्री.गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 20 पथके करण्यात आली असून एक पथक रोज 150 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक मुलासआरोग्य तपासणी पत्रक( हेल्थ कार्ड) देण्यात येणार आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्य सदृढ रहावे या दृष्टीने महाआरोग्य शिबीराचे आयोजन सहा नागरी प्राथमिकआरोग्य केंद्रांवरती करण्यात आले आहे. तज्ज्ञ वैद्यकियआरोग्यअधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबीरांतर्गत रूग्णाच्या विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी या नोंद घ्यावी असे आवाहन मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी केले आहे.
तसेच महापालिकेच्यावतीने आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, रोटरी क्लब ब्लड बँक खांदा कॉलनी, सुधागड स्कूल,एमजीएम हॉस्पीटल, कामोठे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 5 खारघर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन उद्या करण्यात आले आहे. या रक्तदान शिबीरामध्ये रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे.