मुंबई दि.8: ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आज शिक्कामोर्तब केले. आज रेवदंडा येथे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आप्पासाहेबांची भेटही घेतली व शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. यावेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, रायगड भूषण डॉ. सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी तसेच कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
14 मे 1946 रोजी जन्म झालेले पद्मश्री डॉ.दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी गेले 30 वर्ष निरुपण करत असून अंधश्रध्दा,बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरु केल्या आणि आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही केले.
डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. अलीकडच्या काळात संस्थेने सर्वाधिक प्रमाणात वृक्षारोपण केले. त्याशिवाय वृक्षसंवर्धन,तलाव व स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिराचे आयोजनही नियमितरीत्या करण्यात येते. गणेशोत्सव व नवरात्रौत्सवनंतर निर्माल्यातून खतनिर्मिती करून एक पर्यावरणपूरक संदेशही त्यांनी समाजाला दिला आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी हे स्वच्छतादूत म्हणूनही ओळखले जातात
रायगड जिल्ह्यातील रेवदंडामध्ये आप्पासाहेबांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण झाले. बालपणापासून त्यांना कीर्तन ,भजन, अध्यात्मिक वाचन याची आवड होती. याशिवाय त्यांना मैदानी खेळ व पोहणेही आवडायचे. तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी आप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आहे. या कार्याची सुरुवात त्यांचे वडील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी ह्यांनी 1943 सालापासून केली होती आणि आज तेच कार्य, तेवढ्याच जोमाने, तत्परतेने जगभर पोहोचविण्याचे कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी करत आहेत.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!