पनवेल दि.१३: भारतात ‘राष्ट्र’ ही संकल्पना अस्तित्वात नव्हती, असा चुकीचा इतिहास आपल्याला शिकवला गेला. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनीही याचा पुरस्कार केला. आजही तोच इतिहास आपणाला शिकवला जात आहे. महाभारत 5 हजार वर्षापूर्वीचे आहे. त्या वेळी भीष्माचार्यांनी युधिष्ठीराला 300 पिढ्यांचा इतिहास सांगितला. याला वैज्ञानिक आधार असताना हिंदूंचा हा दैदिप्यमान इतिहास दडपून टाकला जात आहे. राष्ट्राचा इतिहास दडपून टाकला, तर राष्ट्राभिमान नष्ट करता येतो, ही इंग्रजांची कुटनीती होती. हिंदु राष्ट्राची पुन्हा स्थापना करताना भारताचा दैदिप्यमान इतिहास समजून घ्यायला हवा. हिंदूंना आत्मरक्षण करायचे असेल, तर आपल्यावर आक्रमण कोण करत आहे, हे त्यांना समजून घेण्याचा त्यांना अधिकार आहे. हिंदूंसाठी भारत ही एकच भूमी राहिली आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्राची स्थापना हा धार्मिक उन्माद नाही. धर्मांधतेचा उन्माद आणि लुटीची लालसा यांमुळे जगातील अनेक सत्ता नष्ट झाल्या आहेत. भारतालाही त्याचा फटका बसला. जी चूक वर्ष 1947 मध्ये झाली, ती चूक पुन्हा होऊ देऊ नका, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने आयोजित पनवेल येथील ‘दि मिडल क्लास को. ऑप. हाऊसिंग सोसायटी’चे मैदान येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडलेल्या हिंदु राष्ट्र जागृती सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक अभय वर्तक, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट आणि हिंदु जनजागृती समिती रणरागिणी शाखेच्या डॉ. दीक्षा पेंडभाजे यांनीही संबोधित केले.
या सभेला सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरू अनुराधा वाडेकर, जय गिरनारी शिवदत्त मंदिर ट्रस्टचे पू. प्रमोद केणे महाराज, वेदविद्या गुरुकुलम् वारियर फाऊंडेशनचे प्राचार्य वेदमूर्ती विष्णुप्रसाद गौतम, ह.भ.प. गणेश महाराज पाटील, ह.भ.प. पुंडलिक महाराज फडके, संत तुकाराम महाराज कोकण दिंडीचे अध्यक्ष ह.भ.प. पद्माकर महाराज पाटील, षड्विकार निर्मूलन सप्ताहाचे सचिव ह.भ.प. परशुराम वाघमारे, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे ह.भ.प. रामदास महाराज चौधरी आणि कार्याध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर, होप इंडियाचे अध्यक्ष प्राचार्य ऋषी वरदानंद आदी मान्यवरांसह संप्रदाय, दत्त संप्रदाय, वारकरी संपद्राय, गायत्री परिवार, सनातन संस्था, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आदी आध्यात्मिक संस्था आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी तसेच भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेकाप आदी पक्षांचे पदाधिकारी यांच्यासह 2 हजाराहून अधिक धर्मप्रेमींची उपस्थिती होती. या सभेचा प्रारंभ मान्यवर वक्ते रणजीत सावरकर यांच्या हस्ते व्यासपीठावर विराजमान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून करण्यात आला. शंखनाद झाल्यावर मान्यवर वक्त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर वेदमंत्रपठण आणि उपस्थित संत, वक्ते, मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे देशभरात चालू असलेल्या व्यापक कार्याविषयी समितीचे सुनील कदम यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे प्रसाद वडके यांनी केले. या सभेस मोठ्या संख्येने लोकांनी लाभ घेतला.
वक्त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाच्या वेळी ‘जयतु जयतु हिंदु राष्ट्रम', ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’,आदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून निघाला. हजारो धर्मप्रेमी हिंदूंनी एकत्रितपणे सभेच्या शेवटी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची शपथ घेतली.