पनवेल दि.23: कोरोना महामारीच्या संकटामुळे उद्भवलेल्या लॉक डाऊनच्या काळात ऑनलाईन साहित्यिक उपक्रम हा नवोदित साहित्यिकांसाठी प्रेरणादायी असल्याचे कोकण मराठी साहित्य परिषदेचे प्रतिनिधी, ज्येष्ठ पत्रकर गणेश कोळी यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्याचा मधुघट समुहातर्फे आयोजित केलेल्या साहित्य संवाद अंतर्गत अभिवाचन या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार किरण बाथम होते. या अभिवाचन उपक्रमात मुरुडच्या दिपाली दिवेकर, महाडचे राकेश मेथा, अलिबागच्या अनुया आपटे, इंदापूरचे प्रा. भरत जोशी, उरणच्या प्रांजल कडू यांनी सहभाग घेतला. या प्रसंगी साहित्याचा मधुघट समुहाचे गझलकार डॉ. रघुनाथ पोवार, अजित शेडगे, हेमंत बारटक्के यांनी सहभाग घेतला. अभिनय आणि वाचन अशा दोन शब्दांपासून अभिवाचन शब्द बनला आहे. नेहमीच्या वाचनापेक्षा विशिष्ट जाणीवेतून, भुमिकेतून जे वाचन केले जाते ते अभिवावन. कथा, कादंबरी, नाटक, कविता इत्यादी ललित कृतीमध्ये दडलेला आशय श्रोत्यांपय्रंत पोहचवणे म्हणजे अभिवाचन होय. ही अभिवाचनाची संकल्पना साहित्याचा मधुघट समुहाचे व उत्कृष्ट निवेदक अजित शेडगे यांनी सुत्रसंचलनयातून मांडली. या अभिवाचनात दिपाली दिवेकर यांनी प्रिया तेंडुलकर धर्म म्हणजे काय या ललित लेखनाचे वाचन केले. राकेश मेहता यांनी शामची आई या पुस्तकातील शामचे पोहणे या लेखाचे वाचन केले. अनुया आपटे यांनी मनशक्ती मासिकातील हरण्यातच जिंकणे आहे या लेखाचे वाचन केले. प्रा. भरत जोशी यांनी माझी टाकलेली आई या लेखाचे अभिवाचन केले. प्रांजल कडू यांनी विलकिन्स ब्लंडवाला ही कथा सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमंत बारटक्के यांनी केले तर आभार संध्या दिवेकर यांनी मानले. कोमसापचे जनसंपर्क प्रमुख रायगड भूषण प्रा. एल.बी. पाटील, उत्तर रायगडचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, अॅड. गोपाळ शेळके यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.