पनवेल,दि.18 : हवा प्रदूषण नियंत्राणाच्या अनुषंगाने बेकरी, हॉटेल्स,रेस्टॉरंट, ढाबा,खाद्यपदार्थ विक्री केंद्रामध्ये तंदूरसाठी स्वच्छ व पर्यावरणपूरक इंधनाचा वापर अनिवार्य करणेबाबत पनवेल मनपाने आत्तापर्यंत 151 आस्थापनांना नोटीसा दिल्याची माहिती उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी दिली.
मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी एमएमआर विभागात वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी स्वतः जनहित याचिका दाखल करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसार हवा प्रदूषण संदर्भात प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यासाठी जोरदार मोहीम सुरू आहे.
या मोहिमेअंतर्गत पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रदूषण निर्माण करणाऱ्या, कोळशाचा वापर करणाऱ्या हॉटेल्स, रेस्टारंट, ढाबा, बेकरी , खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या 151आस्थापनांना महापालिकेने नोटीस पाठवली आहे. हॉटेल व बेकरीमधील भट्ट्यांसाठी यापुढे इलेक्ट्रिक आणि सीएनजीवर चालणाऱ्या शेगड्यांचा वापर करावा लागणार आहे. नोटीसद्वारे संबधितास सूचित करण्यात आले आहे की त्यांनी बेकरी व तंदुरसाठी स्वच्छ व पर्यावरणपुरक इंधन जसे की सीएनजी, एलपीजी किंवा विद्युत असे इंधन पर्याय वापरावेत. इंधन म्हणून कोळसा किंवा लाकडाचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. धोकादायक वायू उर्त्सजन कमी करण्यासाठी योग्य वायू प्रदूषण नियंत्रण उपकरणे (स्क्रबर, आधुनिक चिमणी) बसविणे आवश्यक आहे. तसेच वायु प्रदूषणाचे उत्सर्जन रोखण्यासाठी तंदूर उपकरणांची नियमित देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
महापालिका हद्दीतील 511 हॉटेल्स, रेस्टारंट, ढाबा, बेकरी , खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनापैकी 359 आस्थापना विद्युत व गॅसचा वापर करत आहेत. तर 151 आस्थापना या कोळसा व लाकूडचा वापर करत आहेत. या आस्थापनांना या नोटीस देण्यात आल्या.
या सर्व उपाय योजनांची अंमलबजावणी केल्याबाबत महापालिकेला तातडीने कळवण्याच्या सूचना संबंधित बेकरी व हॉटेल्सना देण्यात आल्या आहेत.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!