ठाणे दि.७: यावर्षींची आषाढी देवशयनी एकादशी रविवार ६ जुलै रोजी संपन्न झाली. पुढच्यावर्षी सन २०२६ मध्ये ज्येष्ठ महिना अधिक असल्याने आषाढी देवशयनी एकादशी १९ दिवस उशीरा म्हणजे शनिवार २५ जुलै २०२६ रोजी येणार आहे.
वारकरी संप्रदायाने या जगाला अनेक गोष्टी दिल्या आहेत. वारकरी हे एक व्रत आहे. वारकरी संप्रदायातील संतांनी अभंग- ओव्यांमधून अध्यात्म सुलभ भाषेत सर्व सामान्य माणसांना उपलब्ध करून दिले. जाती, पंथ, शैव, वैष्णव वाद मोडून काढून सर्व माणसे समान आहेत हे पटवून दिले. कर्मकांडापासून समाजाला मुक्त करून धर्मप्रवण श्रद्धा निर्माण केली. माणसाच्या अंगच्या गुणसंपन्नतेची जोपासना केली. नीती, चारित्र्य,निर्व्यसनीपणाचा आग्रह धरला. ज्ञान, भक्ती आणि कर्म यांची शिकवण दिली. समाजाला एकत्र आणलं. गृहस्थाश्रमाला महत्त्व देऊन प्रपंच करून भक्तीच्या सहाय्याने परमार्थ कसा करावा हे शिकविले. दया, क्षमा, शांती, समता, ममता, एकता यांचा पुरस्कार केला. देवतांबद्दलची भीती घालवून प्रेम, वात्सल्य भावना निर्माण केली. ईश्वराशी माय- लेकराचे वात्सल्याचे नाते निर्माण केले. वारकरी धर्म, भागवत धर्म हा मानवतेचा धर्म असल्याचे शिक्षण दिले. माणसातील देवाचे दर्शन घडविले.
तुम्ही वारीमध्ये जाऊन भक्तीच्या जनसागराचे दर्शन कधी घेतले आहे का ? घेतले असल्यास तुमच्यातील विठ्ठलाला माझा नमस्कार ! घेतले नसल्यास सन २०२६ मध्ये अवश्य घ्या ! पुढच्यावर्षी मंगळवार ७ जुलै२०२६ रोजी देहूहून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. बुधवार ८ जुलै २०२६ रोजी आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. त्या दिंडीत सामील होऊया.
रामकृष्ण हरी !
दा. कृ. सोमण, खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते
![]()
