माथेरान दि.२७: (मुकुंद रांजाणे) अतिवृष्टीमुळे काही तांत्रिक कारणास्तव रेल्वे प्रशासनाने मागील सहा महिन्यांपासून बंद करण्यात आलेली अमन लॉज ते माथेरान दरम्यान धावणारी शटल सेवा आज पासून सुरू करण्यात आल्याने पर्यटकांसह स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसत आहे. माथेरान स्थानकातून सकाळी ०८-४५ वाजता नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी झेंडा दाखवून या सेवेला प्रारंभ झाला आहे.यावेळी नगरपरिषद गटनेते प्रसाद सावंत मुख्याधिकारी रामदास कोकरे, माजी नगराध्यक्ष अजय सावंत, मनोज खेडकर,विवेक चौधरी, नगरसेवक शिवाजी शिंदे, शकील पटेल,रेल्वेचे डी.आर.एम. शलभ गोयल,ए.डी.आर.एम.आशुतोष गुप्ता,एस.वाय.डी.सी.एम.नरेंद्र पवार,ए.आर.डी.एन.वाय.पी.सिंग,एस.एस.ई.मनीष सिंग, विभागीय कमर्शियल इन्स्पेक्टर शिरीष कांबळे, स्टेशन मास्तर जी.एस.मीना यांसह पर्यटक,नागरिक उपस्थित होते. माथेरान मधील सर्व व्यावसायिक, मोलमजुरी करणारे श्रमिक, दुकानदार, स्टॉल्स धारक, हॉटेल व्यावसायिक, लॉज धारक, स्थानिक अश्वपाल, हातरीक्षा चालक या सर्वांचे उत्पन्नाचे साधन आणि जीवनमान हे केवळ मिनिट्रेन वर अवलंबून असते. सहा महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर शटल सेवा सुरू करण्यात आल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. तर आपल्या बालगोपालांना या सेवेचा लाभ मिळणार असल्याने पर्यटकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
शटल वेळापत्रक:
अमन लॉज ते माथेरान स्टेशन
सकाळी ०८-४०,०९-५५,१०-४५,११-५५,दुपारी १२-४५, १४-००,१५-०५,१५-५५,
(शनिवार आणि रविवारी संध्याकाळी १६-४५,१७-३५)
माथेरान ते अमन लॉज स्टेशन
सकाळी -०८-१५,०९-३०,१०-२०,दुपारी १२-००,१३-३५, १४-४०,१५-३०,
शनिवार आणि रविवार
संध्याकाळी १६-२० आणि १७-१०
