Watch all 360 video in iPhone? click the youtube link and open in apps
पनवेल दि.२७: कोकण एज्युकेशनच्या विठोबा खंडाप्पा हायस्कुलचे यंदाचे शतक महोत्सवी वर्ष. शतक महोत्सवाचा सोहळा २९ डिसेंबर रोजी रंगणार आहे. पनवेल शहरात व्ही के च्या शतक महोत्सवाचे अभूतपूर्व असे वातावरण निर्माण झाले आहे. पनवेल शहराच्या मुकुटातील मेरुमणी म्हणजे व्ही के हायस्कुल! गेल्या शतक भरातून माध्यमिक शिक्षण पूर्ण करून अनेक प्रभूती या वास्तूतून मोठ्या झाल्या आहेत. संस्थेचे चेअरमन आमदार बाळाराम पाटील यांनी शतक महोत्सवी सोहळ्याची घोषणा केल्यापासून व्हि के च्या माजी विद्यार्थ्यांची लगबग वाढली आहे. सारे वातावरण व्ही के मय झाल्यासारखे वाटत आहे. अद्ययावत रजिष्ट्रेशन प्रणाली वापरल्याने थेट परदेशातील माजी विर्द्यार्थी देखील प्रतिसाद देत या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वेसर्वा शरद पवार आणि या शाळेचे माजी विद्यार्थी तथा माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या उपस्थितीत शतक महोत्सवी सोहळा रंगणार आहे. २८ तारखेपासून कार्यक्रमांना सुरुवात होणार असून,पहिल्या दिवशी सायंकाळी जे एम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने सुरताल या संगीत रजनी चे आयोजन करण्यात आले आहे. २९ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते १०:३० वाजेपर्यंत माजी विद्यार्थ्यांचे रजिष्ट्रेशन,न्याहारी असेल त्यानंतर सकाळी १०. ४५ वाजता रंगावली प्रदर्शनाचे उदघाटन करून मान्यवर मुख्य मंचावर स्थानापन्न होतील. दुपारी १ वाजेपर्यंत मान्यवरांचे वैचारिक धन लुटण्याचे भाग्य आजी माजी विद्यार्थ्यांना लाभणार आहे. त्या नंतर दु.१ ते ३ वाजेपर्यंत स्नेहभोजन असणार आहे. सायंकाळी ४ वाजल्यापासून आजी माजी विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सुरु होणार आहेत. या सोहळ्यात माजी मुख्याध्यापक,माजी चेअरमन,गुणवंत विद्यार्थी,संस्थेला सढळ हस्ते मदत करणारे दानशूर अशा मंडळींचे सत्कार करण्यात येणार आहेत. याचबरोबर सर्व शिक्षक तसेच आजपर्यंतच्या शैक्षणिक वर्षांतील दहावीमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे देखील सन्मान करण्यात येणार आहेत. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून आमदार बाळाराम पाटील यांनी खबरबातशी बोलताना अधिक माहिती दिली.