पनवेल दि.२८: ‘गाढी नदी वाचवू या’ या उपक्रमातून गाढी नदीचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे, पण यासाठी सर्वानी या मोहिमेत सहभाग घेणे गरजेचे असून गाढी नदीच्या संरक्षण व विकासासाठी लोकसहभाग महत्वाचा ठरेल, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज खांदा कॉलनी येथे केले. गाढी नदीचे पात्र स्वच्छ व सांडपाणी मुक्त ठेवणे आणि घनकचरा व्यवस्थापनेबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी पंचायत समिती सभापती प्रणाली भोईर, उपसभापती वसंत काठावले, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, गटविकास अधिकारी तेटगुरे आदी व्यासपिठावर उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, निसर्ग मित्र संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत कानीटकर यांनी ‘ गाढी नदी वाचवूया ‘ उपक्रमाची थोडक्यात ओळख करून दिली. सुमित यांनी, अभियान आत्तापर्यंतचे प्रवास, श्रमदान आणि त्यांचे नियोजन, त्यामागची भूमिका यांचे फोटोंसह उत्तम रीतीने प्रभावी ठरणारे सादरीकरण केले. त्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विस्तृतपणे नेमकेपणाने कुठेही विषयांतर होऊ न देता नदी स्वच्छतेसाठी प्रशासनासोबत ग्रामस्थांनीही आपली जबाबदारी पार पाडावी असे सांगून गटविकास अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यासोबत चर्चा घडवून आणली. यावेळी निधी नसणे, जागा उपलब्ध नसणे, मार्गदर्शन नसणे आदी ग्रामपंचायतीच्या अडचणी समजून घेतल्या. त्यावर उपाययोजना करण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली.