भांडूप, दि.12 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. 23 मार्चपासून राज्यात लोकडाऊन घोषित करण्यात आला होता. याचाच एक भाग म्हणून महावितरणने गर्दी टाळण्यासाठी, महावितरणचे वीज बिल भरणा केंद्रही तात्पुरता बंद केले होते. मात्र, आता महावितरणच्या भांडूप परिमंडलातील पेण व वाशी मंडळ अंतर्गत काही भाग ग्रीन व ऑरेंज झोन मध्ये आले असून यातील काही वीज बिल भरणा केंद्र दि.11 मई 2020 पासून ग्राहकांसाठी उघडण्यात आले आहेत. महावितरणच्या भांडूप परिमंडलातील पेण मंडळाचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील व वाशी मंडळाचे अधीक्षक अभियंता राजाराम माने यांनी जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा यांच्या कार्यालयातून परवानगी घेतली असता या दोन्ही मंडळातील काही वीज बिल भरणा केंद्र ग्राहकांसाठी उघडण्याची परवानगी काही अटी व शर्तीनुसार देण्यात आली आहे.मात्र, जिल्हाधिकारी रायगड व आयुक्त, पनवेल महानगरपालिका यांनी जाहीर केलेल्या कोरोना बाधित प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये वीज बिल भरणा केंद्र सुरु करण्यास प्रतिबंध आहे. तसेच, वीज देयक स्वीकारताना शारीरिक अंतर राखणे, मास्क परिधान करणे, केंद्राबाहेर मार्किंग करणे, हॅन्ड वॉश करणे इत्यादी सुविधा कामगार, अधिकारी व कर्मचारी यांना पुरविणे बंधनकारक आहे. यात रायगड येथील वाशी मंडल अंतर्गत उरणमधील 8 तर पेण मंडल अंतर्गत अलिबाग-9, पेण-7, गोरेगाव-2, महाड-7, म्हसाळा-6, पोलादपूर-5, श्रीवर्धन-2, कर्जत-2, खालापूर- 1, खोपोली-1, पनवेल-3, माणगाव- 4, मुरुड-2, पाली- 3, रोहा- 3, तळा-2 असे एकूण 67 वीज बिल भरणा केंद्र भांडूप परिमंडल अंतर्गत सुरु करण्यात आले आहेत.
महावितरण भांडूप परिमंडलच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांनी या वीज बिल भरणा केंद्रावर आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश दोन्ही मंडलांना दिले असून जास्तीतजास्त ग्राहकांना ऑनलाईन माध्यमातून वीज बिल भरण्याचे आवाहन केले आहे.