करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव; संपूर्ण उरण तालुका “रेड झोन” म्हणून घोषित !
अलिबाग, दि.12 : करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात लॉकडाऊन कालावधी दि.03 मे 2020 रोजीच्या रात्री 12.00 पासून ते दि.17 मे 2020 रोजीच्या रात्री 12.00 वा. पर्यंत लागू करण्यात आला आहे.
उरण तालुक्यातील करोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निधी चौधरी यांनी संपूर्ण उरण तालुका “रेड झोन” म्हणून घोषित केला असून रेड झोन साठीचे सर्व निर्देश संपूर्ण उरण तालुक्याच्या क्षेत्रासाठी लागू राहतील, असेही जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे.