माथेरान दि.२९ (मुकुंद रांजणे) ई रिक्षाच्या पायलट प्रोजेक्टची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली असताना देखील आजपर्यंत इ रिक्षाच्या संख्येत वाढ न केल्यामुळे ई रिक्षा समर्थक महिला एकवटल्या असून त्यांनी थेट जिल्हाधिकारी यांकडे आपली कैफियत मांडली आहे. ई रिक्षाच्या संपूर्ण प्रक्रियेवर सनियंत्रण समितीने लक्ष केंद्रित करावे असे सुप्रीम कोर्टाचे आदेश असताना सुद्धा या समितीकडून काहीही हालचाली झालेल्या दिसत नाहीत. ई रिक्षामुळे पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. फक्त वीस इ रिक्षाच्या माध्यमातून पर्यटकांना, शालेय विद्यार्थ्यांना तसेच स्थानिकांना ही सेवा पुरविणे अशक्य बाब आहे. एकूण 94 हात रिक्षा चालकांपैकी 20 जणांना ई रिक्षा देण्यात आली असून उर्वरित 74 हातरीक्षा चालकांना सुध्दा या ईरिक्षा लवकरच मिळाव्यात या आशयाचे निवेदन येथील ई रिक्षा समर्थक महिलांनी दिनांक 28 रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे अलिबाग येथील कार्यालयात सादर केले आहे. ई-रिक्षांची संख्या त्वरित वाढविणे, ई-रिक्षाची सेवा चोवीस तास सुरू ठेवणे,क्ले-पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांची कामे पुन्हा सुरू करणे आणि सनियंत्रण समितीमध्ये स्थानिक व्यक्तीची नेमणूक करणे अश्या समस्यांचे गाऱ्हाणे रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनात मांडण्यात आले आहे.जवळपास दोनशे पेक्षाही जास्त महिलांनी सही केलेले निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. यावेळी वर्षा शिंदे,सुहासिनी दाभेकर,रिजवाना शेख,अर्चना बिरामणे,सुजाता जाधव आणि निवृत्त शिक्षिका कल्पना पाटील आदी महिला उपस्थित होत्या.

माथेरानला ई रिक्षा सुरू करण्यासाठी सुरुवातीला राज्यातील कोणत्याही लोकप्रतिनिधीनकडून मग ते आमदार असोत खासदार असोत अथवा कुणी मंत्री असोत हा प्रश्न सुप्रीम कोर्टाशिवाय मार्गी लागणार नव्हता त्यामुळे सर्वांनी आपले हात त्यावेळी झटकले होते. त्यांचे सहकार्य लाभलेले नसताना ही सुप्रीम कोर्टाची लढाई हातरिक्षा संघटनेने यशस्वीपणे पार पाडून सध्या तरी येथे वीस ई रिक्षा सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे ही सुप्रीम लढाई आजही सुरूच आहे. माथेरान या पर्यटन स्थळाकडे शासन सुद्धा नेहमीच का कानाडोळा करत आहे याचे उत्तर स्थानिकांना सध्या तरी मिळत नाही. या सर्व ई रिक्षा पर्यटकांना त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना स्थानिकांना सेवा देणार आहेत. त्यामुळे कुणाही राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधीनी ही सेवा फक्त स्थानिकांनाच द्यावी असा कुटील प्रयत्न व्होट बँकेसाठी कदापी करू नये. कदाचित इथल्या मूठभर मतांसाठी काही राजकीय डावपेच केले जात आहेत की काय असाही संशय हातरिक्षा चालकांकडून व्यक्त केला जात आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!