रत्नागिरी दि.०९(सुनील नलावडे)- रत्नागिरी जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या कोरोना टेस्टिंग लॅबचा शुभारंभ आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन केला. रत्नागिरीतील कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, खा. विनायक राऊत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जि.प.अध्यक्ष रोहन बने, आ.राजन साळवी आदी मान्यवर उपस्थित होते. मुंबईतून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी या लॅबचा शुभारंभ केला. त्यावेळी त्यांचेसोबत रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब होते. तसेच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही या लॅबला ऑनलाइन उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. रत्नागिरीतून बोलताना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदयजी सामंत यांनी मुख्यमंत्र्यांनी लॅब मंजूर केल्याबद्दल त्यांचे आभार मानले व रत्नागिरी व सिंधुुदुर्ग जिल्ह्यात मेडिकल कॉलेज सुरू करावीत अशीही मागणी केली होती. या शुभारंभ प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कोकणात लॅब उभारण्यासाठी माझे एकट्याचे श्रेय नाही तर सर्वांचे श्रेय आहे. लॉकडाऊनंतर जनजीवन सुरळीत होण्यासाठी राज्यातील ८७ वी प्रयोगशाळा कोरोना टेस्टिंग लॅब आहे. आज कोरोनाच्यामुळे आपण राज्यातील लॅबची संख्या जलदगतीने वाढवली आहे. कोरोना बाबतीत उपचार नाहीत ही वाईट गोष्ट आहे. परंतु आपण जागरूकता दाखविली पाहिजे. लॉकडाऊनच्या निमित्ताने कोरोनाने आपल्याला घर दाखविले आहे, कुटुंब दाखवले आहे. मी नेहमी संकटाचे रूपांतर संधीत कसे होईल हे पाहतो. मी मागील काळात कोकणात बैठक घेतली होती त्यावेळी कोकणासाठी ज्या ज्या गोष्टी करणे आवश्यक आहे त्या गोष्टी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यातील बर्याचशा गोष्टी मार्गीही लावल्या. फक्त सिंधुुदुर्ग विमानतळाचा प्रश्न कारोनामुळे मागे पडला होता. आज आरोग्य यंत्रणा सुसज्ज पाहिजे. तळ कोकणात मेडिकल कॉलेज पाहिजे अशी आपली मागणी आहे. मेडिकल कॉलेजसाठी प्रस्ताव करा, तेही करूया आपण त्याही बाबतीत आपण हात घालू, तेही चांगले करू असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. अशा लॅब प्रत्येक जिल्ह्यात असायला पाहिजे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.