दापोली, दि.८ (सुनिल नलावडे) :- निसर्ग वादळाच्या तडाख्याने कोकणची मोठी हानी झाली असून कोकणाला खऱ्या अर्थाने ताकद देण्याची आवश्यकता आहे. वादळाच्या तडाख्यामुळे इथला व्यवसाय, बागा, आंबा, नारळ, सुपारी,काजूंच्या बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे कोकणातील उद्ध्वस्त झाडांना राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीत आलेल्या झाडांप्रमाणे मदत देण्यात यावी तसेच वादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या प्रत्येक घराच्या मदतीत (स्टॅंडर्ड नॉर्म) प्रमाणित नियमांमध्ये तीन पटींची भर राज्य शासनाने घालून पूर्ण उद्ध्वस्त झालेल्या घरांना प्रत्येकील सुमारे तीन लाख रुपये देण्यात यावे अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज केली. तसेच शासनाने कोकणाला दिलेली मदत ही अत्यंत तुटपुंजी आहे. तुटपुंजी मदत देऊन शासनाने कोकणाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. ही मदत उभारी देण्यासाठी काही कामाची नाही. याकरिता शासनाने कोकणाला वाढीव मदत द्यावी अशी मागणीही विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी आज केली.
निर्सग चक्रिवादळाचा मोठा फटका रत्नागिरी जिल्ह्याला बसला आहे. जिल्ह्यातील मंडणगड, दोपोली तालुक्यांचे या चक्रिवादळात प्रचंड नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज रत्नागिरीचा दौरा केला. या दौऱ्यात आमदार भाई गिरकर, आमदार प्रसाद लाड, भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी माजी आमदार विजय नातू यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष केदार साठे, तालुकाप्रमुख मकरंद म्हादलेकर, श्रीराम इदाते, स्मिता जावकर, उदय जावकर, जया साळवी, इकबाल परकार आदी उपस्थित होते.उपस्थित होते. याप्रसंगी दरेकर यांनी दापोली तहसीलदार कार्यालय येथे शासकीय अधिका-यांसमवेत बैठक घेतली याप्रसंगी महसूल, पोलिस, कृषी, वैद्यकीय व विद्युत वितरणचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी चक्रिवादळाच्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. या बैठीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पत्रकारांशी संवाद साधताना दरेकर म्हणाले,निसर्ग वादळाच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेले एक झाड पुढील पंधरा ते वीस वर्षे उत्पन्न देणार होतं. हे झाड कोसळल्याने सुमारे १५ वर्षाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने कोल्हापुरात मदत करण्यात आली, त्याच धर्तीवर जनावर, झाड, घर यांचे नुकसान लक्षात घेऊन तशी मदत कोकणात देखील करावी. प्रत्येक आंब्याला किंवा झाडाला जसा आपल्या (नॅशनल हायवे) राष्ट्रीय महामार्ग हद्दीत झाड गेल्यानंतर भविष्यात पंधरा वर्षे ते झाड काय उत्पन्न देणारे होतं त्याचा आधारित मदत केली जाते त्याच प्रमाणे निसर्ग चक्रिवादळामुळे कोसळलेल्या झाडांना मदत द्यावी. तसेच या भागातील लाखो घरे पूर्णपणे उदध्वस्त झाली आहेत, त्या उद्ध्वस्त झालेल्या घरांसाठी स्टॅंडर्ड नॉर्म प्रमाणे रुपये ९० हजार देऊन चालणार नाही. तर त्या ठिकाणी प्रत्येक घराच्या मदतीत स्टॅंडर्ड नॉर्ममध्ये तीन पटींची अधिक भर राज्य शासनाने घालावी. पूर्ण उद्ध्वस्त झालेल्या घरांना प्रत्येकी सुमारे तीन लाख रुपये देण्यात यावे. त्यांचा अंतर्भाव पंतप्रधान आवास योजनेमध्ये होणे अपेक्षित असल्याने कोकणाला जी मदत देण्याची आवश्यकता आहे याबाबत अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन इथले जनजीवन सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जी मदत लागेल ती आम्ही मिळवून देऊ. तसेच राज्य शासनामार्फत जी तातडीची मदत द्यायची आहे ती मदतीसाठी आम्ही आग्रही राहू पण येथील नागरिकांचे विस्कळित झालेले जनजीवन लवकरात लवकर सुरळीत करावे अशी विनंतीही सरकाराला करण्यात येणार असल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.
दरेकर यांनी सांगितले की, रत्नागिरी दौऱ्या दरम्यान निसर्ग चक्रिवादळाने प्रभावित झालेल्या वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन आढावा घेण्यात आला. हे करताना केवळ नाममात्र दौरा करून लोकांशी बोलायचे फोटो काढायचे आणि निघुन जायचे या दृष्टीने आम्ही आलो नाहीत. तर,कोकणाला निसर्ग वादळाने झोडपले असून येथील गावे उध्वस्त केली आहेत त्यासंदर्भात पाहणी करण्यासाठी आम्ही आलो आहोत.
वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आम्ही एकत्रित फिरण्याऐवजी तीन ते चार लोकांचे पथक तयार करून अधिकाधिक गावांची पाहणी करून आढावा घेण्यात आला आहे. अशाप्रकारे जास्तीजास्त गावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहील. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गावकऱ्यांशी चर्चा करून वस्तुस्थिती समोर येईल.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आल्यावर या बांधवांना आणखी ताकदीने मदत करता येणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले.
निसर्ग वादळाच्या तडाख्याने बाधित झालेल्या नुकसाग्रस्तांसाठी ७५ कोटींची घोषणा करण्यात आली ती अत्यंत तुटपुंजी आहे. रायगडला १०० कोटी देण्यात आले आहेत पण त्यापेक्षाही जास्त नुकसान रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे झाले आहे. त्यामुळे २५ आणि ७५ कोटींची मदत दाढेलाही पुरणार नाही अशी टीका करताना दरेकर म्हणाले, चक्रिवादळाच्या तडाख्यात अनेक गावांचे नुकसान झालं आहे आणि जे अधिक प्रमाणात ग्रासले आहेत त्यामध्ये हरणे, तांझ, अंजर्ली या गावांची पाहणी करण्यात आली. त्याचबरोबर आमदार भाई गिरकर यांनी लाटघर,करंजगाव, तामसतीर्थ या गावांची पाहणी केली. तर आमदार प्रसाद लाड यांनी मुरुड, पालंदे या गावांना भेटी दिल्या. त्यानंतर आमची तीन पथके मंडणगडला एकत्रित येऊन तेथील परिस्थितीतचा आढावा घेण्यात आला. विरोधी पक्षाचा हा दौरा म्हणजे केवळ दिखावा करायचा नाही. तर या ठिकाणच्या वादळग्रस्त लोकांना दिलासा तात्काळ देण्याची आवश्यकता आहे तो देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर सेवा कार्य करण्याता येत आहे. कोकणातील लोकांना घरांचे पत्रे, कौल ,अन्नधान्य त्याचबरोबर दिव्यांची व्यवस्था उद्या पर्यंत पोहोचणार आहे. तहसीलदार नुकसानीच्या खर्चाचा अधिकृत आकडा घेऊन आमच्या स्वयंसेवी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सेवाकार्य मोठ्याप्रमाणावर करून इथल्या जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. निसर्ग चक्रिवादळ आले तेव्हा विरोधी पक्ष नेता या नात्याने सर्वप्रथम अलिबाग रायगड येऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. येथील परिस्थितीची तीव्रता लक्षात आल्यावर सरकारचे लक्ष वेधलं. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अलिबागला यावे लागले. अशाप्रकारे विरोधी पक्ष म्हणून या विषयाचं गांभीर्य लक्षात घेत कोकणसाठी आवश्यक उपाययोजनांची आग्रही मागणी करतोय. या मागणीची पूर्तता व्हावी म्हणून आमचे सात ते आठ आमदार या ठिकाणच्या तालुक्यांमध्ये ठाण मांडून बसणार आहेत. अशाप्रकारे कोकणवासीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न दौऱ्याच्या माध्यमातून राहणार असल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!