मुंबई दि.१४: यावर्षी बुधवार, १५ जानेवारी या दिवशी मकर संक्रांती आहे. मकर संक्रांती ही अशुभ असते असा आपल्याकडे जो समज आहे. त्यात काहीही तथ्य नाही. सूर्यावे सायन मकर राशीत प्रवेश केला की आपल्याइथे दिनमान वाढत जाते. दिनमान वाढत जाणे हे अशुभ किंवा वाईट कसे असू शकेल ? असा प्रश्न उपस्थित करून पंचांगकर्ते , खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी मकर संक्रांती सणाचे महत्त्व पटवून सांगितले. ते मकर संक्रांती विषयी अधिक माहिती देताना म्हणाले की सूर्याने रविवार, २२ डिसेंबर २०१९ रोजी सायन मकर राशीत प्रवेश केला.. या दिवशी उत्तरायणारंभ म्हणजे सूर्य उत्तरेकडे जाऊ लागला. त्यादिवसापासून आपल्या इथे दिनमान वाढत गेले. या दिवशी आपल्याइथे दिवस १० तास ५८ मिनिटांचा असून रात्र मोठी म्हणजे १३ तास ०२ मिनिटांची होती आपली पंचांगे ही निरयन पद्धतीवर आधारलेली असल्याने सूर्य निरयन मकर राशीत ज्यादिवशी प्रवेश करतो. त्याप्रमाणे मकर संक्रांतीचा दिवस ठरतो. यावेळी मंगळवार दि. १४ जानेवारी २०२० रोजी उत्तररात्री २ वाजून ८ मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत करीत आहे. त्यामुळे निरयन मकर संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवार दि. १५ जानेवारी २०२० रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे. आपले सर्व सण हे तिथींवर अवलंबून असतांना मकर संक्रांतीचा सण तेवढा इंग्रजी तारखेप्रमाणे १४ जानेवारीलाच का येतो ? असा प्रश्नही नेहमी विचारला जातो. मकर संक्रातीचा सण हा नेहमी १४ जानेवारीला येतो हे खरे नाही. तसेच मकरसंक्रांतीचा सण हा इंग्रजी तारखेवरही अवलंबून नाही. हा सण सूर्य निरयन मकर राशीत सूर्य प्रवेश कधी करतो त्यावर अवलंबून असतो. सूर्याने एकदा मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा तो मकर राशीत प्रवेश करीपर्यंत ३६५ दिवस,६ तास,९ मिनिटे १० सेकंद एवढा कालावधी लागतो. ग्रेगरीयन कॅलेंडरच्या नियमाप्रमाणे शतकपूर्तीच्या अंकास चारशेनी भाग जात नसेल तर ते लीप वर्ष धरले जात नाही. त्यामुळे दर चारशे वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस ३ दिवसांनी पुढे जातो. तसेच दरवर्षींचा ९ मिनिटे १० सेकंद हा काल साठत जाऊन दर १५७ वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस आणखी एक दिवसाने पुढे जातो.सन २०० मध्ये निरयन मकर संक्रांती २२ डिसेंबरला येत होती.सन १८९९ मध्ये निरयन मकर संक्रांत १३ जानेवारीला आली होती. सन १९७२ पर्यंत निरयन मकर संक्रांती १४ जानेवारीलाच येत होती. १९७२ पासून सन २०८५ पर्यंत निरयन मकर संक्रांत कधी १४ जानेवारीला तर कधी १५ जानेवारीला येईल. सन २१०० पासून निरयन मकर संक्रांती १६ जानेवारीला येईल. अशा रितीने पुढे जात सन ३२४६ मध्ये निरयन मकर संक्रांती चक्क १ फेब्रुवारीला येणार आहे. यावरून आपल्या लक्षात येईल की मकर संक्रांती आणि १४ जानेवारी यांचा काहीही संबंध नाही.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!