महापौरपदी डॉ. कविता चौतमोल, उपमहापौरपदी जगदिश गायकवाड
तर पोटनिवडणुकीत रुचिता लोंढे यांचा दणदणीत विजय

पनवेल दि.१०: पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर पद निवडणुकीत जगदिश गायकवाड व नगरसेवकपदाच्या पोटनिवडणुकीत रुचिता लोंढे या भाजप, आरपीआय, मित्रपक्षाच्या उमेदवारांनी भरघोस मताधिक्य मिळवून दणदणीत व अपेक्षित विजय मिळवित पनवेलमध्ये महाविकासाआघाडीचा दारुण पराभव केला. पनवेल महापालिकेची स्थापना १ ऑक्टोबर २०१६ रोजी झाली. पनवेलच्या पहिल्याच निवडणुकीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ७८ नगरसेवकांपैकी ५१ नगरसेवक जिंकून पनवेल महापालिकेवर विजयाचा झेंडा रोवला. अडीच वर्षानंतर पुन्हा महापौर पदासाठी निवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीत भाजप मित्रपक्षांच्या उमेदवार डॉ. कविता चौतमोल तर उपमहापौर पदासाठी जगदिश गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच शेकापनेही या पदांसाठी आपला उमेदवार दिला. पक्षीय बळाबल पाहता भाजप उमेदवारांचे पारडे अधिक जड होते, त्यामुळे फक्त निकालाची औपचारिकता शिल्लक होती. ती आज ४९ विरुद्ध २७ असा निकाल जाहीर होऊन पूर्ण झाली. त्यानुसार पुन्हा एकदा महापौरपदी डॉ. कविता चौतमोल तर उपमहापौर म्हणून जगदिश गायकवाड दणदणीत मतांनी विजयी झाले. नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी प्रभाग १९ ब च्या पोटनिवडणुकीत मुग्धाताईंच्या कन्या रुचिता यांना संधी देण्यात आली. लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रुचिता लोंढे यांचा घरोघरी जाऊन जोरदार प्रचार केला. विरोधकांनी प्रचाराच्या अनेक क्लुप्त्या केल्या मात्र आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर त्या फोल ठरल्या. या निवडणुकीत रुचिता गुरुनाथ लोंढे यांना ६२३१ तर महाविकास आघाडीच्या उमेदवार स्वप्नल लक्ष्मण कुरघोडे यांना अवघी २३८७ मते पडली. रुचिता यांनी तब्बल ३८४४ मतांची आघाडी घेऊन शिवसेनेच्या स्वप्नल कुरघोडे यांचा दणदणीत पराभव केला. त्यामुळे महाविकासाआघाडीच्या नथीतून वार करण्याचा प्रयत्न करणारी शिवसेना पनवेल महानगरपालिकेत शून्यावरच राहिली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या हाती भोपळाच अशी चर्चा पनवेलमध्ये रंगली होती. यावेळी सर्व विजयी लोकप्रतिनिधींचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष जयंत पगडे, सभागृहनेते परेश ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी घोषणा, ढोलताशा व फटाक्यांच्यागजरात जल्लोष साजरा करण्यात आला. त्यामुळे पनवेलमध्ये सर्वत्र जल्लोषमय वातावरण पहायला मिळाला.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!