पनवेल,दि.17 : माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षणाचे महत्व शालेय स्तरावरील तसेच महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीद्वारे बिंबवण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आज डी.डी. विसपुते शिक्षणशास्त्र महाविद्यालयात टाकाऊ पासून टिकाऊ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत पर्यावरणाचे महत्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समजावे यासाठी उपायुक्त डॉ.वैभव विधाते यांच्या सूचनेनूसार शाळा व महाविद्यालयांमध्ये शिबिरे,व्याख्याने, वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, वृक्षारोपण, प्रश्नमंजूषा, चर्चासत्र, विविध खेळांचे आयोजन करण्यात येत आहेत. माझी वसुंधरा अभियानातील आकाश, जल, वायू, भूमी, अग्नि या महत्वाच्या घटकांनूसार डी.डी. विसपुते शिक्षणशास्त्र महाविद्यालयात टाकाऊ पासून टिकाऊ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये विद्यार्थींनीनी घरातील टाकाऊ पदार्थापासून पासून सुंदर अशा टिकाऊ व शोभेच्या वस्तू तयार करण्यात आल्या होत्या.
या कार्यक्रमास आदर्श शैक्षणिक समुहाचे अध्यक्ष धनराज विसतुते, महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख अनिल कोकरे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा कांबळे उपस्थित होत्या. यावेळी उत्तम वस्तू तयार केलेल्या विद्यार्थीनीना प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.