पनवेल दि.30: महिलांवरील वाढते अत्याचार, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अपुरी मदत, मराठा आरक्षणाचा झालेला खेळखंडोबा, वीज बिल, कोरोना स्थिती हाताळण्यात आलेले अपयश पाहता असे कर्तृत्व नसलेले महाविकास आघाडी सरकार नशिबी येणे हे महाराष्ट्राच्या जनतेचे मोठे दुर्दैव आहे, असे प्रतिपादन आमदार निरंजन डावखरे व आमदार महेश बालदी यांनी आज पनवेल येथे केले. भारतीय जनता पार्टीतर्फे शहरातील मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, ज्येष्ट नेते श्रीनंद पटवर्धन आदी उपस्थित होते.  
यावेळी दोन्ही आमदारांनी महाविकास आघाडीने जनतेचे केलेल्या बिकट अवस्थेचे पाढे वाचले. ते म्हणाले की, मराठा आरक्षणाचा या सरकारने खेळखंडोबा करून टाकला आहे. सर्वोच्च न्यायालयात सरकारला नीट बाजू मांडता न आल्याने मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. आता या सरकारने मराठा समाजाचे शैक्षणिक आरक्षणही रद्द केले आहे. महाआघाडी सरकारने आपली फसवणूक केल्याची भावना मराठा समाजात आहे. अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. बळीराजाला अतिशय तोकडी मदत देताना या सरकारने निव्वळ बहाणे शोधले. शेतकर्‍यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता सरकारने जाहीर केलेली मदत ही तोंडाला पाने पुसणारी आहे. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीनंतर उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जिरायत शेतीसाठी २५ हजार आणि बागायती शेतीसाठी ५० हजार रूपये हेक्टरी मदतीची मागणी केली होती. फळबागांसाठी एक लाखांपर्यंत मदत त्यांनी मागितली होती. सत्तेत आल्यावर आपण काय बोललो होतो, याचा विसर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पडला आहे.  

ते म्हणाले की, गेल्या वर्षभरात महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरलेला नाही. दिशा कायदा लागू करण्याच्या घोषणा हवेतच विरल्या आहेत. हे सरकार एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देऊ शकत नाही.तीन महिन्यांचा पगार न मिळाल्याने ३ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यानंतर सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पॅकेज जाहीर केले. सामान्य माणसाला भरमसाठ वीज बिले पाठविली गेली आहेत. वीज बिल माफ करण्याचे आश्वासनही या सरकारने पाळले नाही. पत्रकार अर्णब गोस्वामी, अभिनेत्री कंगना राणावत यांच्यावर केलेल्या कारवाईने आघाडी सरकार सूडबुद्धीने काम करते आहे, हेच दिसले आहे. समाज माध्यमांमधून या सरकारविरोधात बोलणाऱ्या लोकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होतो आहे. आज पर्यंत शेकडो समस्याबाबात लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना निवेदने, पत्रे दिली गेली आहेत, मात्र त्याच्यावर उत्तर दिले जात नाहीत, याच्यावरून हे सरकार किती काळजी करणारे आहे ते दिसते. मुख्यमंत्री पद मोठे आहे त्यामुळे त्याला साजेसे असे वक्तव्य करणे क्रमप्राप्त आहे मात्र राज्याचे मुख्यमंत्री उर्मट भाषेत व संयम न ठेवता बोलत दर्शन घडवीत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. 

ठाकरे सरकारने महाराष्ट्राचे एक वर्ष वाया घालवले, या सरकारच्या ढिसाळ कारभाराची भरपाई करण्यासाठी राज्याला अनेक वर्षे लागतील. घरात बसून राज्यकारभार हाकणारा मुख्यमंत्री राज्याच्या जनतेचे दुःख, हालअपेष्टा जाणून घेऊ शकतच नाही. मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांच्या आर्थिक व्यवहाराबाबत आरोप होत आहेत. मात्र मुख्यमंत्री त्याबाबत चकार शब्दही उच्चारण्यास तयार नाहीत. जनादेशाचा विश्वासघात करून सत्तेवर आलेल्या या सरकारने सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे, असेही यावेळी त्यांनी नमूद केले .

३६५ दिवसात महाराष्ट्र्राला अधोगतीकडे नेण्याचे काम महाविकास आघाडीने केले असून जे काही निर्णय घेतले ते केवळ स्वार्थापोटी निर्णय घेतले असून फक्त सहा महिन्यात बदल्यांचे ऑर्डर आणि त्याचे टेंडर करण्याचे काम करून बदल्यांच्या मालिकेत भ्रष्टाचार महाविकास आघाडीने केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. त्यामुळे पलटू आणि बदलू सरकार म्हणून महाविकास आघाडी सरकार परिचित झाली असल्याचे त्यांनी नमूद करतानाच लोकांना दिलासा न देता लोकांच्या भावनांशी खेळण्याचे पाप महाविकास आघाडी सरकार करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!