ठाणे दि.01: ठाण्यातील प्रसिध्द मामलेदार मिसळचे मालक लक्ष्मण मुर्डेश्वर यांचं आज कोरोनामुळे निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. गेले काही दिवस कौशल्य हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण अखेर आज दुपारी त्यांचं निधन झालं. लक्ष्मणशेठ मुर्डेश्वर यांचे वडील नरसिंह मुर्डेश्वर यांनी १९५२ मध्ये तहसिल कार्यालयात कँटीन सुरू केलं. त्यांच्या पश्चात लक्ष्मणशेठ यांनी ही परंपरा पुढे अखंड सुरू ठेवली. गेली अनेक वर्ष मिसळीच्या दर्जामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड न करता खवय्यांची सेवा ते करत होते. त्यांच्या मिसळीची प्रसिध्दी ठाण्यातच नव्हे तर अगदी दूरदूर पसरली होती. गेल्या आठवड्यामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर कौशल्य रूग्णालयात उपचार सुरू होते. कालपर्यंत त्यांच्याकडून उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र आज त्यांचं निधन झालं. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, नातवंडं, सून असा परिवार आहे.