ग्रहणांचे काहीही परिणाम होणार नाहीत !
ग्रहणांचा आणि कोरोना महामारीचा काहीही संबंध नाही !
मुंबई दि.29: सोमवार, ३० नोव्हेंबर रोजी छायाकल्प चंद्रग्रहण आणि सोमवार १४ डिसेंबर रोजी खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. ही दोन्ही ग्रहणे भारतातून दिसणार नसल्याचे खगोलअभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. या विषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की सोमवार, ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १-०० ते सायं. ५-२६ यावेळेत चंद्र पृथ्वीच्या विरळ छायेतून जाणार असल्याने छायाकल्प चंद्रग्रहण होणार आहे. परंतू हे छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. हे ग्रहण उत्तर पूर्व यूरोप, अमेरिका, ओसेनिया, ॲास्ट्रेलिया आणि आशियाच्या काही भागातून दिसणार आहे..
तसेच सोमवार, १४ डिसेंबर रोजी या वर्षातील अखेरचे खग्रास सूर्यग्रहण रात्री ७-०३ ते १२-२३ यावेळेत होणार आहे. हे खग्रास सूर्यग्रहणही भारतातून दिसणार नसल्याचे सोमण यांनी स्पष्ट केले. हे सूर्यग्रहण पॅसिफिक महासागर, दक्षिण अमेरिकेचा दक्षिण भाग, अंटार्क्टिका आणि आफ्रिकेचा दक्षिण पश्चिम भाग येथून दिसेल.
ही ग्रहणे चीनला वाईट असून भारताला चांगली असल्याचे भाकित काही लोकांनी केले आहे, त्यात काहीही तथ्य नाही. चंद्र-सूर्यग्रहणे ही खगोलीय नैसर्गिक घटना असते. त्यांचा मानवी जीवनावर व देशांवर काहीही परिणाम होत नसतो हेही दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केले.