ठाणे दि.21: या वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण येत्या बुधवारी, वैशाख पौर्णिमेच्या दिवशी २६ मे रोजी दुपारी ३-१५ ते सायं. ६-२३ यावेळेत होणार असून ते आपल्या इथून दिसणार नाही. मात्र या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ  येणार असल्याने सुपरमूनचे दर्शन संपूर्ण भारतातून होणार असल्याचे खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. 

    याविषयी अधिक माहिती देताना दा. कृ. सोमण म्हणाले की हे चंद्रग्रहण अतिपूर्व ईशान्य भारतातून ओरिसातील पुरी, भुवनेश्वर,कटक,कोलकत्ता, आसाम, मिझोराम , मेघालय, नागालॅंड, अरुणाचल, मणिपूर आणि अंदमान निकोबार बेटे येथून दिसणार आहे.आपल्या इथे त्यावेळी चंद्र दृश्य आकाशात नसल्याने आपल्याइथून हे चंद्रग्रहण दिसणार नाही. तसेच हे चंद्रग्रहण चीन, जपान, कोरिया, थायलंड, सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिकेतील काही भाग येथून दिसणार आहे.

सुपरमून दिसणार !
बुधवार, २६ मे रोजी या वर्षातील अखेरच्या सुपरमूनचे दर्शन मात्र आपणा सर्वास साध्या डोळ्यानी घेता येणार आहे. चंद्र हा पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार कि. मीटर अंतरावर आहे. पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्याजवळ आला तर चंद्रबिंब १४ टक्के मोठे व ३० टक्के जास्त तेजस्वी दिसते. यावेळी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्याजवळ ३ लक्ष ५७ हजार ३१० कि.मीटर अंतरावर येणार आहे . त्यामुळे तो मोठा व जास्त तेजस्वी दिसणार आहे. बुधवारी, वैशाख पौर्णिमेच्या दिवशी २६ मे रोजी सायं. ७ वाजून १४ मिनिटांनी सुपरमून पूर्वेला उगवेल. रात्रभर आकाशात सुंदर, मनोहारी दर्शन देऊन उत्तररात्री ६ वाजून ३६ मिनिटांनी मावळेल. यानंतर पुढच्यावर्षी सन २०२२ मध्ये १४ जून व १३ जुलै रोजी सुपरमून स्थिती होणार आहे. परंतू ते दिवस पावसाळ्याचे असल्याने दर्शन होणे कदाचित कठीण जाणार आहे. सन २०२३ मध्ये सुपरमून दिसणार नाही. सन २०२४ मध्ये १८ सप्टेंबर व १० आक्टोबर, सन २०२५ मध्ये ५ नोव्हेंबर व ४ डिसेंबर आणि सन २०२६ मध्ये २४ डिसेंबर रोजी सुपरमून दर्शन होणार असल्याचे दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!