प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात झाला प्रवेश सोहळा
पनवेल दि.२७: थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमधील राजकीय उलथापालथीमुले तेथील वातावरण अचानक तापले आहे. माथेरान नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्यासह १० नगरसेवकांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. राज्यात प्रमुख सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. रायगडचे माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांची कार्यपद्धती व नेतृत्व भावल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केल्याचे या नगरसेवकांनी बोलताना आवर्जून नमूद केले.
माथेरान नगरपालिकेत एकूण १४ नगरसेवक आहेत. त्यापैकी १४ नगरसेवक शिवसेनेचे होते, त्यातील दहा जणांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात हा प्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेश सोहळ्यास रायगडचे माजी पालकमंत्री आमदार रविंद्र चव्हाण, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आदी उपस्थित होते.
या पक्षांतरामुळे माथेरान नगरपालिकेत भाजप बहुमतात आला आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये आकाश चौधरी (उपनगराध्यक्ष/ आरोग्य समिती सभापती), राकेश चौधरी, सोनम दाभेकर, प्रतिमा घावरे, रुपाली आखाडे, सुषमा जाधव, प्रियांका कदम,ज्योती सोनावळे, संदीप कदम, चंद्रकांत जाधव यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या झालेल्या पराभवानंतर राज्यातील महाविकास आघाडीला भाजपनं हा दुसरा झटका दिला आहे. चंद्रकांत पाटील यांनी या निमित्तानं महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. ‘झोपेत असतानाच एक दिवस हे सरकार पडेल. सरकारची झोपमोड कधीच झाली आहे,’ असे चंद्रकांत पाटील म्हणाले. ‘भाजपमध्ये प्रत्येकाचा सन्मान केला जातो. गुणवत्तेप्रमाणे संधी दिली जाते. त्यामुळं आता भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माथेरानमधील पदाधिकाऱ्यांंनाही योग्य ती संधी दिली जाईल,’ असे आश्वासन पाटील यांनी दिलं.