पनवेल दि.१०: महिलांचे लेखन सत्याच्या जवळ जाणारे असून नव्या बदललेल्या वातावरणात महिलांचे लेखन आयुष्याची खरी बाजू दाखवते असे उद्गार कवी अरुण म्हात्रे यांनी पनवेल येथे काढले.जागतिक महिला दिनानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषद रायगडच्यावतीने सन्मान कर्तृत्वाचा अंतर्गत स्त्री सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते,यामध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रायगड जिल्ह्यातील साहित्यिक महिलांना पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
पनवेलच्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ,सभागृह येथे झालेल्या समारंभास पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौर प्रमिला पाटील,चित्रपट नाट्य निर्मात्या कल्पना कोठारी, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे,नगरसेविका दर्शना भोईर,कोमसापाचे रायगडचे अध्यक्ष संजय गुंजाळ,जिल्हा प्रतिनिधी गणेश कोळी,महिला प्रमुख संध्या दिवकर,युवाशक्ती प्रमुख सिद्धेश लखमदे उपस्थित होते.
चित्रपट नाट्य निर्मात्या कल्पना विलास कोठारी यांनी,आजच्या या युगामध्ये स्त्रिया अनेक क्षेत्रात स्वतःचं कर्तृत्व दाखवत आहेत.स्त्रियांनी आपल्या आयुष्यामध्ये स्वतःच्या आनंदासाठी नेहमी जागृत रहावे,असा त्यांनी संदेश देऊन साहित्यातील क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्याचा जो उत्सव स्त्री सन्मान पुरस्काराच्या निमित्ताने आज साजरा करत आहात ते कौतुकास्पद आहे असे त्यांनी सांगितले.कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्ह्याने सामाजिक बांधिलकी जपत,पनवेल तालुक्यातील कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेली कोरलवाडीतील सर्व आदिवासी महिलांनी आपल्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा खाली ठेवला होता आणि समाजातील इतर नागरिकांप्रमाणे आम्हालाही शुद्ध पाणी मिळावे या मागणीसाठी रायगड जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आणि त्यांच्या या लढायला यश मिळाले त्याबद्दल जय भवानी महिला बचत गटाच्या सुवर्णा गुरुदास वाघे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रायगड महिला प्रमुख संध्या दिवकर यांनी केले तर आभार योगिनी वैदू यांनी मानले.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!