पनवेल दि.१८: कर्नाळा नागरी सहकारी बँकेत केलेल्या ५१२.५० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी शेकापचे नेते, माजी आमदार आणि कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्यासोबत बँकेच्या संचालक मंडळांतील १४ सदस्यांसह एकूण ७६ जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे जवळपास ५१२. ५० कोटींचे कर्ज काढल्याप्रकरणी सहकार खात्याच्या तक्रारीवरून सोमवार १७ फेब्रुवारी रोजी फिर्यादी म्हणून जिल्हा विशेष लेखा परिक्षक उमेश गोपिनाथ तुपे यांनी केलेल्या तक्रारीनुसार सहकारी संस्था अधिनियम सह महाराष्ट्र ठेविदारांचे हितसंबधांचे रक्षण अधिनियम गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरच्या गुन्ह्याचा तपास तपास पोलीस निरीक्षण (प्रशासन) शत्रुघ्न माळी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कर्नाळा बँकेच्या हजारो ठेवीदारांना व खातेदारांना पैसे मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे. वारंवार आश्वासने देऊन ठेवीदारांना पैसे परत मिळत नाही. याशिवाय बोगस कागदपत्रांच्या आधारे जवळपास ५१२. ५० कोटी कर्ज काढल्याचा ठपका सहकार खात्याने कर्नाळा बँकेवर ठेवला आहे. ठेवीदारांचे पैसे देण्यास विवेक पाटील वारंवार टाळाटाळ करण्याबरोबरच ठेवीदारांना मग्रुमीने उत्तर देत होते. ठेवीदार आणि खातेदारांच्या सहनशीलतेचा अंत झाल्याने याप्रकरणी न्याय मिळावा यासाठी या लोकांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्याकडे धाव घेतली. व त्या अनुषंगाने न्याय मिळवून देण्याच्या प्रामाणिक भूमिकेतून प्रसिद्ध लेखापाल किरीट सोमैय्या यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही लोकप्रतिनिधींनी कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून सहकार खाते व आरबीआय यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. सहकार खात्याबरोबरच पाठपुरावा करीत असताना मागिल महिन्यात आरबीआयवर तसेच नुकताच पनवेलमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला होता. याची दखल घेत सहकार खात्याच्या तक्रारीवरून कर्नाळा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पाटील आणि बँकेच्या १४ संचालकांसह एकूण ७६ जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.