पनवेल दि. १८: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी परीक्षा आज पासून सुरु होत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून एकूण १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. १८ फेब्रुवारीपासून १८ मार्चपर्यंत बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. पनवेल तालुक्यात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील १० हजार ६०८ विद्यार्थी ही परीक्षा देत असून ११ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येत आहे. तालुक्यातील सुधागड हायस्कूल कळंबोली, दत्तूशेठ पाटील विद्यालय कामोठे, सीजेएम शाळा खारघर, आर. जे. म्हात्रे विद्यालय नावडे, महात्मा फुले महाविद्यालय पनवेल, बान्स हायस्कूल पनवेल, सीकेटी शाळा नवीन पनवेल, बांठिया हायस्कूल नवीन पनवेल, व्ही. के. हायस्कूल पनवेल, लोधिवली विद्यालय, मोहपाडा आणि मोहपाडा विद्यालय मोहोपाडा आदी केंद्रांवर ही परीक्षा होत आहे. कळंबोलीतील सुधागड हायस्कूल आणि पनवेल शहरातील व्ही. के. हायस्कूल या दोन ठिकाणी परीरक्षण केंद्र अर्थात कस्टडी असणार आहे. या केंद्रातून प्रश्नपत्रिका,उत्तरपत्रिका पुरविल्या जाणार आहेत. याशिवाय प्रत्येक केंद्रावर केंद्र संचालक आणि त्यांचा चमू तैनात होणार आहे. कळंबोली सुधागड शाळेत सर्वाधिक म्हणजे १,६८८ परीक्षार्थी आहेत. त्या खालोखाल पनवेल शहरातील व्ही. के. हायस्कूलमध्ये १,५४१ विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. मोहोपाडा विद्यालय सर्वात कमी म्हणजे ३७७ परीक्षार्थी आहेत.