पनवेल दि.३०: कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्यातील ८५ आरोपीतांविरुध्द पुरावा गोळा करण्याचे काम सुरु असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी लक्षवेधी सुचनेला दिलेल्या लेखी उत्तरात दिली आहे.
पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष व संचालकांनी हजारो कोटी रूपयाचा गैरव्यवहार केला असल्याचे उघडकीस झाले. या बँकेच्या अध्यक्ष व संचालकांनी केलेल्या कोटयावधी रूपयाच्या बँकेतील आर्थिक घोटाळयाबाबत पनवेल शहर पोलीस ठाणे, येथे जिल्हा विशेष लेखा परिक्षक वर्ग-१, सहकारी संस्था अलिबाग जि.रायगड यांनी दिनांक १७ फेब्रुवारी २०२० रोजी गुन्हा दाखल झाला आहे. बराच कालावधी नंतर बँकेच्या अध्यक्षांच्या स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करून अध्यक्षांना अटक होवून जवळपास ४ ते ५ महिन्यांचा कालावधी होवूनसुद्धा बँकेच्या खातेदारांना आपली आयुष्याची पुंजी म्हणुन बँकेत ठेवलेली रक्कम परत देण्यासाठी बँकेच्या व्यवस्थापनाकडून असमर्थता दर्शविली जात आहे. सदर बँकेतील हजारो कोटी रूपयाच्या गैरव्यवहारात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या संचालक व अधिकाऱ्यांवर अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही, त्यामुळे खातेदार व ठेवीदारांमध्ये शासनाच्या विरोधात चिड निर्माण झालेली, असून खातेदार व ठेवीदारांना त्यांच्या बँकेतल्या ठेवी तातडीने परत मिळण्यासाठी तसेच सदर गैरव्यवहारात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी असणा-या संचालक व अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई काय केली अशी लक्षवेधी सुचना आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मुंबई येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात दाखल केली होती.
या लक्षवेधीवर गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले कि, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कर्नाळा नागरी सहकारी बँक, पनवेल यांच्या दि.३१/०३/२०१८ रोजी केलेल्या तपासणीमध्ये बँकेने मंजूर केलेल्या कर्जप्रकरणामध्ये गंभीर आक्षेप निदर्शनास आल्यामुळे दि. २२/०४/२०१९ रोजी बँकेच्या कर्ज व्यवहाराचे विशेष लेखापरिक्षण करण्याबाबत सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांना कळविले होते. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांचे आदेशान्वये जिल्हा विशेष लेखा परिक्षक यांनी लेखापरिक्षण करुन कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या लेखा परिक्षणामध्ये बँकेचे अध्यक्ष, संचालक व पदाधिकारी यांनी संगणमताने केलेल्या विनातारणी, गैरविनियोग व गैर व्यवहारामुळे सभासद, बँकेचे ठेवीदार व खातेदार यांच्या ठेवी धोक्यात आल्या असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० तसेच भारतीय दंड संहिते नुसार गुन्हा दाखल करण्याची जिल्हा विशेष लेखा परिक्षक यांनी शिफारस केली आहे. त्यानुसार कर्नाळा नागरी सहकारी बँक, पनवेल (ता.पनवेल जि. रायगड) चे अध्यक्ष व संचालक यांचेविरूध्द सहकारी संस्था अधिनियम कलम १४७ सह महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल केलेल्या गुन्हयात ६७ बनावट कर्ज प्रकरणांची व्याजासह रक्कम रुपये ५४३,६१,४९,३७२/- अशी आहे. नमूद गुन्हयातील एकूण ठेवीदार ५०,६८९ असून त्यांची एकूण ठेव रक्कम ५२९,७२,४०,८७९.९३/- रुपये आहे. कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे ठेवीदार ५०,६८९ असून त्यांचे केवायसी कागदपत्र प्राप्त करण्याचे त्यांची यादी बनविण्याचे काम सध्या बँक व्यवस्थापनाकडून सुरु आहे. फिर्यादीतील ७६ व निष्पन्न ०९ असे एकूण ८५ आरोपीतांविरुध्द पुरावा गोळा करण्याचे काम सुरु आहे. कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष, संचालक/पदाधिकारी यांच्या स्थावर व जंगम मालमत्ता याची माहिती घेऊन महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ अंतर्गत सदरची मालमत्ता गोठविण्याकरीता अधिसूचित करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी, रायगड अलिबाग यांचेकडून शासनास प्राप्त झाला आहे. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने त्याबाबतची पडताळणी करुन अधिसूचना निर्गमित करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!