पनवेल, दि. २७: पनवेल महापालिका क्षेत्रात आज ओमिक्रॉन बाधित पाच रूग्ण आढळले असून हे यातील तीन रूग्ण हे परदेशी दौरा करून आलेले आहेत उर्वरित दोन जण हे परदेशातून आलेल्या प्रवाशांचे निकटवर्तीय आहेत. या सर्वांचे आजाराचे स्वरूप सौम्य असून त्यांच्यापासून संक्रमण वाढू नये यासाठी पालिकेने उभारलेल्या कळंबोली येथील सीसीआयच्या जंबो कोविड सेंटरमध्ये ओमिक्रॉन विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. यातील एक रूग्ण सुअस्थ रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये खारघर येथील चार रूग्ण ओमिक्रॉन ने बाधितअसून पनवेल शहरातील एक नागरिक आहे. हे रूग्ण दक्षिण आफ्रिका,दुबई, युनायटेड किंग्डम (अमेरिका) येथून आले आहेत. सदर रूग्णांच्या सोसायट्यां सील करण्यात आल्या आहेत. तसेच हा भाग कंटेन्मेट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. सर्व परिस्थितीवरती महापालिका लक्ष ठेवून आहे.
आत्तापर्यंत परदेशातून 2360 प्रवासी आले असून यातील 1389 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे यातील 5 नागरिक हे ओमिक्रॉन् बाधित आढळले आहेत.
राज्यात ओमिक्रॉन बाधित (Omicron) रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यापार्श्वभूमीवर आयुक्त गणेश देशमुख यांनी पालिका क्षेत्रात काळजी, चाचणी, उपचार आणि विलगीकरण यावर भर दिला आहे. त्यासोबतच पालिका क्षेत्रात रात्रीची जमावबंदी घोषित करण्यात आली असून रात्री 9 ते सकाळी 6 सहा पर्यंत पाच पेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहेत. ओमिक्रॉनचे संक्रमण लक्षात घेता नववर्षाच्या स्वागताचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे करू नयेत, नागरिकांनी काळजी घ्यावी आणि कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.