थोर देणगीदार रामशेठ ठाकूर यांनी रयतेला भरभरून दिले – रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार
‘राम’ चा रामशेठ रयतमुळे – लोकनेते रामशेठ ठाकूर
सातारा-कर्मवीरभूमी दि.२७ (हरेश साठे) थोर देणगीदार रामशेठ ठाकूर यांनी धनाचा उपयोग सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी करत रयतला भरभरून दिले आहे, त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हि आमची जबाबदारी आहे, असे गौरवोद्गार रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री, खासदार शरद पवार यांनी आज सातारा येथे केले.
तन, मन, धनाने शिक्षण क्षेत्राला सर्वस्व अर्पण करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अफाट कर्तुत्वाला सलाम करण्यासाठी सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या अद्ययावत सुविधायुक्त अशा ‘लोकनेते रामशेठ ठाकूर भवन’ चे उदघाटन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री, खासदार शरद पवार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात समारंभपूर्वक झाले. कर्मवीरांच्या भूमीत आजचा दिवस समस्त रायगडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा होता, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या कर्तृत्वाने शिक्षण क्षेत्रात समाजसेवकाची भूमिका बजावली. आणि हा सोहळा डोळ्यात आणि हृदयात साठवून ठेवण्यासाठी राज्यातून विविध क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतक उपस्थित होते. या समारंभपूर्वक हृद्य सोहळ्याने सर्वच जण भारावून गेले होते. संपूर्ण वातावरण प्रसन्नदायी झाला होता. त्यावेळी मनोगत व्यक्त करताना खासदार शरद पवार बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, कार्याध्यक्ष ऍड. भगिरथ शिंदे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर, चिरंजीव आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, संस्थेचे सचिव विठ्ठल शिवणकर, कायदेशीर सल्लागार ऍड. दिलावर मुल्ला, मॅनेजिंग कौन्सिलच्या सदस्या मीनाताई जगधने, ऍड. रवींद्र पवार, राजेंद्र फाळके यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यास रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, ठाकूर कुटुंबीय त्याचबरोबर संस्थचे जनरल बॉडी सदस्य अरूणशेठ भगत, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, तसेच पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक,नगरसेविका, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, आणि हितचिंतक आवर्जून उपस्थित होते.
रामशेठ म्हणजे देणगीची खैरात – खासदार श्रीनिवास पाटील
रामशेठ ठाकूर हे माझे मित्र आहेत. प्रत्येक व्यक्ती शेवटी रिकाम्या हाती जातो पण रामशेठ यांनी एवढे कर्तृत्वाने कार्य केले आहे कि ते भरल्या हातानेच राहणार आहेत. रामशेठ यांच्या शब्दात ताकद आहे. रामशेठ म्हणजे देणगीची खैरात आहे, त्यामुळे रामशेठला कशाचीही भीती नाही. आम्हाला कोटीवर किती शून्य असतात ते लिहता येत नाही पण रामशेठ कोटीच्या कोटी देणगी देतात. असे श्रीनिवास पाटील यांनी सांगतानाच ‘जय हो राम’ अशी गर्जना केली आणि या माझ्या मित्राचे वैभव आणि दानशूरपणाने डोळ्यात आनंदाश्रू वाहत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
लोकनेते रामशेठ ठाकूर रयतेचे एटीएम – डॉ. अनिल पाटील – चेअरमन, रयत शिक्षण संस्था
रयत शिक्षण संस्थेचे पहिले महाविद्यालय छत्रपती शिवाजी कॉलेज आहे. आणि या महाविद्यालयात रामशेठ ठाकूर यांनी शिक्षण घेतले आणि ते कर्तृत्वाने मोठे झाले त्यांच्या नावाने येथे भवन उभारले आहे, त्याचा आम्हा सर्व रयतसेवकांना अत्यानंद आहे. येथील प्रत्येक वास्तू पुण्यवान व्यक्तीची आहे, त्यामुळे रामशेठ यांच्या नावाचे भवन भावी पिढीचे भविष्य घडविणारी वास्तू आहे. रामशेठ ठाकूर यांनी संस्थेच्या जडणघडणीत भरभरून दिले आहे. प्रत्येक हाकेला साद त्यांनी दिली आहे. पवारसाहेब आणि रामशेठ ठाकूर साहेब आमच्याकडे आहेत त्यामुळे आम्हाला कशाचीही भीती नसून लोकनेते रामशेठ ठाकूर रयतेचे एटीएम आहेत.
‘राम’ चा रामशेठ रयतमुळे – लोकनेते रामशेठ ठाकूर
स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे ज्यांनी आत्मसात केले तो व्यक्ती मोठा झाला आहे. रयत शिक्षण संस्था माझे घर आहे. कर्मवीर अण्णांची कृपादृष्टी झाली नसती तर आम्ही सुशिक्षित झालो नसतो. आम्हाला पैलू पाडण्याचे काम अण्णांनी केले आहे, त्यामुळे ‘राम’ चा रामशेठ रयतमुळे झाला आहे. पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही रयत शिक्षण संस्थेत काम करीत आहोत याचा आम्हाला अभिमान आहे, त्यांचे सातत्याने संस्थेला मार्गदर्शन लाभते. मी त्यांच्या सोबत राजकारणात गेलो नाही पण त्यांचा शिक्षण क्षेत्राचा आदर्श घेऊन वाटचाल केली. अण्णांचा आशीर्वाद आणि पवारसाहेबांची साथ यामुळे शिक्षण क्षेत्रात वाटचाल सुरु आहे. अण्णांच्या आपुलकीने विशेष संस्कार घडले. त्यामुळे आपल्याकडे असलेला काहीतरी भाग समाजासाठी द्यावा, हि कायम ईच्छा असते, त्यामुळे रयत शिक्षण संस्थेचे ऋण फेडू तेवढे कमी आहेत. आजचा समारंभ माझ्या आयुष्यातील मोजक्या पाच दहा समारंभापैकी एक आहे. रयतेचे आपल्यावर अफाट उपकार आहेत, त्यामुळे संस्थेच्या विकासासाठी यापुढेही आपले सहकार्य राहील.